सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून धुव्वा उडवला, तर दुसऱ्या पुणे कसोटीत 113 धावांनी भारतावर वर्चस्व गाजवत मालिका 2-0 ने आपल्या खिशात घातली. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला आपली इज्जत राखावी लागणार आहे.
भारताला 3 किंवा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉश करणारा न्यूझीलंड हा पहिला संघ बनू शकतो. भारताच्या कसोटी इतिहासात आजपर्यंत असे कधी घडले नाही. कोणत्याही संघाने घरच्या मैदानावर भारताला व्हाईटवॉश दिला नाही. पण न्यूझीलंडला असे करण्याची संधी आहे. आता मुंबई कसोटीत भारतीय संघ कसा पुनरागमन करतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.
2000 मध्ये भारताला घरच्या मैदानावरील कोणत्याही मालिकेत एकही कसोटी सामना जिंकता आला नव्हता. दक्षिण आफ्रिकेने 2 सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली. त्यावेळी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) भारतीय संघाचा कर्णधार होता. या मालिकेत भारताला 4 डावात 250 धावांचा टप्पा ओलांडता आला नव्हता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली या मालिकेत विजय मिळवला होता.
3 सामन्यांच्या कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाले, तर भारताला शेवटची वेळ 1997 मध्ये श्रीलंकेविरूद्ध एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यावेळीही सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) कर्णधार होता आणि अर्जुन रत्नतुंगा श्रीलंकेचा कर्णधार होता. आता भारतीय संघ (Team India) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली नकोसा रेकाॅर्ड आपल्या नावावर करण्याच्या मार्गावर आहे.
भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना (1 ते 5 नोव्हेंबर) दरम्यान मुंबईत खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; मुंबईच्या मैदानावर जयस्वालच्या नावावर होणार ‘हा’ धमाकेदार रेकाॅर्ड?
“त्याच्यावर शंका घेणे अयोग्य”, रोहित शर्माच्या समर्थनार्थ आला सर्वात जवळचा मित्र
सलग पराभवानंतर टीम इंडियात होणार मोठे बदल! हे 3 खेळाडू होऊ शकतात तिसऱ्या कसोटीतून बाहेर