भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना रविवार, 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरेल, तर न्यूझीलंड आपला पहिला किताब जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. या ऐतिहासिक सामन्यापूर्वी आयसीसीने (ICC) एका भव्य क्लोजिंग सेरेमनीचे (सांगता समारंभ) आयोजन केले आहे, ज्यामध्ये तीन दिग्गज कलाकार चाहत्यांचे मनोरंजन करतील.
अहमदाबादच्या स्टेडियमवर होणाऱ्या या सोहळ्यात हे कलाकार आपले सादरीकरण करतील. ज्यामध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेते प्यूर्टो रिकोचे पॉप स्टार रिकी मार्टिन त्यांच्या लॅटिन पॉप हिट्सनी एक लाखांहून अधिक चाहत्यांना मंत्रमुग्ध करतील. तसेच, भारतीय तडका देण्यासाठी ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठक आपल्या गाण्यांनी स्टेडियममध्ये उत्साह निर्माण करेल. याचबरोबर, प्रसिद्ध पंजाबी गायक सुखबीर आपल्या लोकप्रिय गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करतील.
स्टेडियमचे दरवाजे दुपारी 3:30 वाजता उघडतील. तसेच क्लोजिंग सेरेमनीची सुरुवात संध्याकाळी 5:30 वाजता होणार आहे. सेरेमनीची सांगता संध्याकाळी 6:15 वाजता होईल. त्यानंतर टॉस (नाणेफेक) संध्याकाळी 6:30 वाजता होईल आणि सामन्याची सुरुवात संध्याकाळी 7:00 वाजता होईल.
विद्यमान चॅम्पियन असलेला भारतीय संघ न्यूझीलंडला हरवून इतिहास रचण्याच्या इराद्याने उतरेल. भारताने सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला होता, तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर 10 विकेट्सने विजय मिळवून फायनल गाठली आहे. जर भारताने हा सामना जिंकला, तर 2007 आणि 2024 नंतर तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा तो सर्वात यशस्वी संघ ठरेल. तसेच, यजमान देश म्हणून टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरेल.





