नुकतात भारतीय संघाने मायदेशात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांची टी२० मालिकेत ३-० अशा फरकाने विजय मिळवला आहे. टी२० संघाचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली संघाने अप्रतिम खेळ दाखवत पाहुण्यांना व्हाईटवॉश दिला आहे. कर्णधार रोहितच्या मते भारतीय संघाच्या या यशामधील सर्वात मोठा सकारात्मक पैलू राहिला, त्याचे गोलंदाजी आक्रमण. त्यातही अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने प्रभावशाली प्रदर्शन करत संघाच्या विजयात हातभार लावला.
टी२० क्रिकेटमध्ये विकेटची आवश्यकता असताना ३५ वर्षीय फिरकीपटू अश्विन हा नेहमीच भारतीय संघासाठी एक आक्रमक पर्याय राहिला असल्याचे रोहितचे म्हणणे आहे. अश्विनच्या प्रदर्शनाचे कौतुक करताना रोहितने टी२० विश्वचषक २०२२ मधील त्याच्या उपस्थिती विषयी मोठे संकेतही दिले आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी२० मध्ये ७३ धावांनी विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहित म्हणाला की, “अश्विन नेहमीच कोणत्याही कर्णधारासाठी एक आक्रमक पर्याय राहिला आहे. जेव्हा तुमच्याकडे त्याच्यासारखा गोलंदाज असतो, तेव्हा तुमच्याकडे मधल्या षटकात विकेट मिळवण्याच्या संधीही उपलब्ध होतात. सर्वांनाच मधल्या षटकांच्या टप्प्यांचे महत्त्व माहित आहे. दुबईत टी२० विश्वचषकाचे सामने खेळल्यानंतर अश्विनने शानदार पुनरागमन केले आहे. तो खूप चांगला गोलंदाज आहे आणि आम्हाला सर्वांना ही गोष्ट खूप चांगलीच माहिती आहे.”
“गेल्या बऱ्याच वर्षांपासून अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. इतकेच नव्हे तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही त्याचे आकडे जास्त वाईट नाहीत. त्याने दुबई आणि मायदेशातील न्यूझीलंडच्या टी२० सामन्यांमध्ये ज्याप्रकारची गोलंदाजी आहे, त्यावरुन त्याच्या योग्यतेचा अंदाज लागतो,” असेही रोहित म्हणाला.
“प्रत्येक क्रिकेटप्रेमीला माहित आहे की, मधल्या षटकांमध्ये धावांच्या गतीवर अंकुश लावणे आणि विकेट्स मिळवणे किती आवश्यक असते. अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या जोडीने भारतीय संघासाठी अशीच भूमिका बजावली आहे. ते दोघेही मधल्या षटकात विकेट मिळवण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. त्यामुळे एका कर्णधारासाठी त्यांच्यासारख्या गोलंदाजांची उपलब्धता नेहमीच फायदेशीर ठरते,” असे रोहित पुढे म्हणलाा.
रोहितच्या या वक्तव्यावरुन त्याने अश्विनची टी२० कारकिर्द अजून संपली नसून तो पुढील टी२० विश्वचषक २०२२ मध्येही भारतीय संघाकडून खेळताना दिसू शकण्याची शक्यता वर्तवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ पाच कारणांमुळे न्यूझीलंड संघ भारतासमोर झुकला, सलामीवीरांनी पार पाडली महत्वाची भूमिका
लेकाची काळजी! शोएब मलिकची मुलाची प्रकृती बिघडल्यामुळे टी२० मालिकेतून तडकाफडकी माघार






