---Advertisement---

कानपूर कसोटीची नाट्यमय अखेर! न्यूझीलंडच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ

On: सोमवार, नोव्हेंबर 29, 2021 5:27 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना नाट्यमयरीत्या अनिर्णित अवस्थेत संपला. कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला विजयाची सर्वाधिक संधी असताना, न्यूझीलंडच्या अखेरच्या जोडीने कमालीचा संयम दाखवत सामना अनिर्णित राखला. मात्र, शेवटच्या अर्ध्या तासात मैदानावर बरेच नाट्य पाहायला मिळाले.

भारतीय गोलंदाजांचे शानदार कमबॅक
सामन्याच्या अखेरच्या दिवशी १ बाद ४ या धावसंख्येवरून पुढे खेळताना न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथम व चौथ्या दिवशीचा नाईट वॉचमन विल समरविल यांनी संपूर्ण पहिले सत्र भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. मात्र, दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी तीन बळी मिळवत पुनरागमन केले. अखेरच्या सत्रात भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी सहा गडी बाद करणे आवश्यक होते.‌ भारतीय गोलंदाजांनी अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, ते न्यूझीलंडचा अखेरचा गडी बाद करू शकले नाहीत.

अखेरच्या जोडीने वाचवला सामना
न्यूझीलंडचा नववा गडी टीम साऊदीच्या रूपाने बाद झाला. यानंतरही जवळपास ९ षटकांचा खेळ होणे शिल्लक होते. या सामन्यात पदार्पण करणारा अष्टपैलू रचिन रवींद्र हा मैदानावर उभा होता. अखेरचा फलंदाज म्हणून फिरकीपटू एजाज पटेल मैदानावर उतरला. भारताचे तीनही फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा व अक्षर पटेल यांनी अखेरचा गडी बाद करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, रचिन आणि एजाज यांनी त्यांना यश मिळू दिले नाही. तब्बल ५२ चेंडूची अभेद्य भागीदारी करत त्यांनी सामना अनिर्णित राखला.

प्रकाशाचा झाला खेळ
न्यूझीलंडची अखेरची जोडी मैदानात असताना सर्व चाहत्यांचे लक्ष पंच नितीन मेनन आणि वीरेंद्र शर्मा यांच्याकडे होते. कारण, अखेरच्या जवळपास अर्ध्या तासात मैदानावरील प्रकाश कमी झाला होता. त्यामुळे दोन्ही पंच वारंवार लाईट मीटर बाहेर काढत पुरेसा प्रकाश उपलब्ध आहे की नाही हे पाहत होते. मात्र, अखेरीस याच प्रकाशाने भारतीय संघाचा खेळ केला. खराब प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवला व न्यूझीलंड संघ सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरला. मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvNZ, 1st Test: अखेरच्या चेंडूपर्यंत रोमांचक झालेली कानपूर कसोटी अनिर्णित; जडेजा-अश्विनचे प्रयत्न व्यर्थ

पदार्पणात भीषण अपघात, आफ्रिदीचा बाऊंसर डोक्याला लागल्याने बांगलादेशचा खेळाडू गंभीर जखमी

धक्कादायक!! शेन वॉर्नचा मोठा अपघात, १५ मीटर पेक्षा लांब घासत गेली बाईक; मुलगाही होता सोबत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---