जगाच्या पाठीवर कोणत्याही मैदानावर भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना असो, या सामन्याचा थरार शिगेलाच असतो. नुकत्याच यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात याची प्रचिती दिसून आले. या सामन्याची तिकिटे बघता बघता विकली गेली. विशेष म्हणजे हा सामना ना भारतात खेळवला गेला, ना पाकिस्तानमध्ये, पण प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत या सामन्याने मोठा विक्रम केला आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) माहिती दिली आहे की, हा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना इतिहासातील सर्वाधिक पाहिला जाणारा सामना ठरला आहे.
आयसीसीच्या मते, टी-२० विश्वचषक ही यूएई आणि ओमानमध्ये होणारी आतापर्यंतची सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा ठरली आहे. या स्पर्धेने अनेक क्षेत्रांतील प्रेक्षकसंख्येचा विक्रम मोडला. यामध्ये १६७ दशलक्ष दूरदर्शन (टी.व्ही) पाहण्याचा विक्रमी समावेश आहे. इतकेच नाही तर, स्टार इंडिया नेटवर्कमध्ये भारतातील १५.९ अब्ज मिनिटांचा विक्रमी वापर समाविष्ट झाला आहे, जो या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान नवा विक्रम नोंदवण्यात आला होता. हा सामना आता टी-२० आंतरराष्ट्रीय इतिहासातील सर्वाधिक पाहिला जाणारा सामना ठरला आहे.
यापूर्वी २०१६ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या आयसीसी स्पर्धेत भारत-वेस्ट इंडिज उपांत्य फेरीचा सामना या यादीत अव्वल होता. त्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्ध पहिलाच सामना होता. भारताला या टी-२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचता आले नाही. पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडकडूनही भारतीय संघाचा पराभव झाला होता. सलग दोन पराभवांमुळे भारतीय संघाचे टी२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने नंतर सलग ३ सामने जिंकले असले तरीही उपांत्य फेरीत त्यांच्या गटातून केवळ पाकिस्तान आणि न्यूझीलंडनेच स्थान मिळवले.
भारताने स्पर्धेतून लवकर बाहेर पडल्यानंतरही, देशातील संपूर्ण स्पर्धेसाठी एकूण टीव्ही दर्शकांचा वापर ११२ अब्ज मिनिटे नोंदवला गेला. ‘लाइव्ह द गेम’ या अत्यंत यशस्वी मार्केटिंग मोहिमेमुळे भारतातील तरुण प्रेक्षकांचा (१५ वर्षांखालील मुले) यात १८.५ टक्के इतका वाटा होता. भारतातील डीझनी आणि हॉटस्टारवर स्पर्धेसाठी डिजिटल वापरात प्रचंड वाढ झाली आहे. युकेमध्ये, स्काय युकेवरील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी प्रेक्षकसंख्या ६० टक्क्यांनी वाढली, तर एकूण दर्शकसंख्या ही सात टक्क्यांनी वाढली आहे.
आयसीसीच्या फेसबुकसोबतच्या भागीदारीतून बनवलेल्या व्हिडिओंमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. सर्व चॅनेलवर स्पर्धेसाठी एकूण ४.३ अब्ज व्हिव्ज नोंदवले गेले. गेल्या वर्षी, एकदिवसीय विश्वचषकादरम्यान ३.६ अब्ज व्हिव्ज नोंदवले गेले होते. आसीसीने त्यांच्या सोशल मीडिया चॅनेलवर ६१८ दशलक्ष व्हिव्ज मिळवले, आयसीसी पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या २०१९ हंगामापेक्षा ही २८ टक्केपेक्षा मोठी वाढ आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“त्यादिवशी द्रविडने धोनीला खडसावले आणि फिनीशरचा जन्म झाला”
जर्सी नंबरपासून रचिन-रवींद्रमध्ये ‘या’ आहेत समानता
“धोनी यशस्वी होईल यावर वरिष्ठ खेळाडूंना शंका होती”; सेहवागचा मोठा गौप्यस्फोट