आशिया चषक २०२२ ही स्पर्धा येत्या २७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याने या स्पर्धचे रणशिंग फुंकले जाईल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान दुबईत भिडतील. दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. १५ ऑगस्टपासून तिकीटांची विक्री सुरू होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) ट्विट करून ही माहिती दिली.
एसीसीने लिहिले की, ‘आशिया चषक २०२२च्या तिकिटांची विक्री १५ ऑगस्टपासून सुरू होईल. यासोबतच एसीसीने ऑनलाइन प्लॅटफॉर्मची माहितीही शेअर केली आहे ज्याद्वारे चाहते आशिया कपसाठी तिकिटे खरेदी करू शकतात. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यासह प्रमुख क्रिकेट देश या स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत तर पात्रता सामने ओमानमध्ये युएई, कुवेत, सिंगापूर आणि हाँगकाँग यांच्यात खेळले जाणार आहेत. त्याचा पहिला सामना २० ऑगस्ट रोजी हाँगकाँग आणि सिंगापूर यांच्यात होणार आहे.
आशिया चषक यापूर्वी श्रीलंकेत होणार होता
आशिया चषक स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, ही स्पर्धा यावर्षी श्रीलंकेत खेळवली जाणार होती, परंतु तेथील राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे आयोजन समितीने ही स्पर्धा युएईमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला. याबाबत, एसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, “श्रीलंकेतील सध्याची परिस्थिती पाहता, एसीसीने विस्तृत विचारविमर्शानंतर सर्वानुमते असा निष्कर्ष काढला आहे की ही स्पर्धा श्रीलंकेतून युएईला हलवणे योग्य ठरेल.”
भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे
आशिया कपपूर्वी भारतीय संघ १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र, रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत यासारखे खेळाडू या मालिकेत खेळत नाहीत. या दौऱ्यातून केएल राहुल भारतीय संघात पुनरागमन करत आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याच्याशिवाय दीपक चहरही ६ महिन्यांनी संघात परतणार आहे.
टीम इंडियाने ७ वेळा आशिया कप जिंकला आहे
आशिया चषकाच्या इतिहासात भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने ७ वेळा विजेतेपद पटकावले आहे, तर श्रीलंकेचा संघ ५ वेळा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. पाकिस्तानने दोनदा आशिया कप जिंकला आहे. मात्र, भारत-पाकिस्तान संघांमध्ये कधीही अंतिम सामना खेळला गेला नाही. भारताने ४ वर्षांपूर्वी बांगलादेशला हरवून आशिया कप जिंकला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ZIMvsIND: राहुलने गाजवलेलं झिम्बाब्वेविरुद्धच पदार्पण, आता कॅप्टन म्हणून मिळवणार पहिला विजय?
Asia Cup 2022 | भारताचे पारडे पाकिस्तानपेक्षा जड, ‘हा’ अष्टपैलू खेळाडू आहे कारण
झिम्बाब्वे दौरा जिंकण्यासाठी राहुलकडे आहेत ‘हे’ ३ हुकमी एक्के! कोणत्याही क्षणी निकाल बदलण्यात पटाईत