अगदी तोंडावर आलेल्या आशिया चषक २०२२ मधील महामुकाबला २८ ऑगस्टला रंगणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील मोठा सामना दुबई क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी दोन्हीही संघातील खेळाडू युएईत कसून सराव करत आहेत. तत्पूर्वी क्रिकेटप्रेमींमध्ये भारत आणि पाकिस्तान संघातील जुन्या विवादांच्या चर्चा रंगल्या आहेत.
भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील वाद म्हटले की, भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) ही नावे सर्वात आधी तोंडात येतात. बऱ्याचदा हे खेळाडू मैदानावर आपापसांत भिडताना दिसले होते. परंतु दोघांमध्ये एक असाही वाद झाला होता, ज्यामुळे अख्तर हरभजनला भांडायला त्याच्या हॉटेलमधील खोलीपर्यंत गेला होता. अख्तरने स्वत: हॅलो ऍपवर बोलताना याबद्दल खुलासा केला होता.
काय होता नेमका वाद?
अख्तरने (Shoaib Akhtar Clash With Harbhajan Singh) सांगितले होते की, “मी हरभजनसोबत भांडायला त्याच्या हॉटेलमधील खोलीपर्यंत पोहोचलो होतो. तो आमच्यासोबत खातो, लाहोरमध्ये आमच्यासोबत फिरतो, तो आमचा पंजाबी भाऊ आहे. तरीही तो आमच्यासोबत दुर्व्यवहार करेल. मला वाटले की, मी जाईल आणि त्याच्याशी हॉटेलच्या खोलीतच भांडण करेल. हरभजनलाही माहिती होते की, मी त्याच्यासोबत भांडायला जाणार होतो. परंतु मी त्याला हॉटेलमध्ये शोधूच शकलो नाही. मग दुसऱ्या दिवशी माझा राग शांत झाला आणि त्याने माझी क्षमाही मागितली होती. म्हणून हा वाद तिथेच मिटला होता.”
हा वाद २०१० सालच्या आशिया चषकातील आहे. या हंगामादरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना सुरू असताना हरभजन आणि अख्तरची मैदानावर बाचाबाची झाली होती. या सामन्यात भारताला शेवटच्या ७ चेंडूत विजयासाठी ७ धावांची गरज होती. यावेळी अख्तरने हरभजनला खेळता येणार नाही असा चेंडू टाकत त्याला डिवचले होते. यावरून त्यांच्यात मैदानावर चांगलाच वाद झाला होता. त्यानंतर हरभजनने मोहम्मद आमीरला षटकार मारत भारताला तो सामना जिंकून दिला होता.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला पाणी पाजण्यासाठी रोहितचे ‘मिशन ८९’; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण
‘तू आता चांगला नाचतोस!’ पुजाराने दिलेल्या उत्तरामुळे आकाश चोप्राची बोलती बंद
‘उमरान मलिकला संधी द्यायला हवी होती!’ पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने चोळले जखमेवर मीठ