भारतात क्रिकेटचा सामना सुरु असताना अनेकदा चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत असतात. अनेकदा तर स्टेडियममधील प्रेक्षकांनी एखाद्या निर्णयाविरुद्द किंवा एखाद्यो गोष्टीबद्दल तीव्र पद्धतीने विरोधही दर्शवला आहे. १९९६ च्या विश्वचषकातील भारत-श्रीलंका उपांत्य सामनाही याचेच उदाहरण आहे. त्यावेळी कोलकाताला झालेल्या या सामन्यात भारत पराभूत होणार म्हणून चक्क प्रेक्षकांनी मैदानात आग लावली होती.
या घटनेनंतर पुन्हा एकदा ३ वर्षांनी कोलकातामध्येच अशी घटना घडली की पुन्हा कोलकाताचे इडन गार्डन २ वर्षांसाठी काळ्या यादीत सापडले होते. १९९९ ला भारत – पाकिस्तान संघात झालेल्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरला धावबाद दिल्याने प्रेक्षकांनी दंगे केले होते.
झाले असे की १९९९ च्या भारत-पाकिस्तान कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा एशियन चॅम्पियनशिपचाही भाग होता. हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर झाला होता. त्या सामन्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका कसोटी सामन्याला सर्वाधिक प्रेक्षक उपस्थित राहिले होते. या सामन्याच्या पहिल्या चार दिवसात १ लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. तर शेवटच्या दिवशी ६५ हजारांहून अधिक प्रेक्षक होते.
त्या सामन्यात भारताने शानदार सुरुवात केली. जवागल श्रीनाथच्या शानदार गोलंदाजीपुढे आणि त्याला मिळालेल्या वेंकटेश प्रसादच्या साथीमुळे पाकिस्तान संघ २६ धावांवरच ६ बाद असा कोलमडला होता. परंतू असे असतानाही मोईन खानने पाकिस्तानचा डाव सांभाळताना सलीम मलिकबरोबर(३२) ८४ धावांची भागीदारी केली. तर वासिम अक्रम(३८) बरोबर ६३ धावांची भागीदारी केली. त्यामुळे पाकिस्तानला पहिल्या डावात १८५ धावा करता आल्या. मोईनने ७० धावांची खेेळी केली होती.
त्यानंतर उतरलेल्या भारतीय संघाच्या फलंदाजांनाही खास काही करता आले नाही. केवळ सदागोपाल रमेशने ७९ धावा करत भारताचा डाव सांभाळला होता. त्या डावात सचिनलाही पहिल्याच चेंडूवर शोएब अख्तरने त्रिफळाचीत केले होते. तरी भारताला त्या डावात निदान २२३ धावा करता आल्याने ३८ धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात पाकिस्तानकडून सईद अन्वरने चौथ्या विकेटसाठी मोहम्मद युसुफ (५६) ११५ धावांची भागीदारी रचली. पण दुसऱ्या डावातही पाकिस्तानची फलंदाजी पुन्हा एकदा श्रीनाथच्या गोलंदाजीसमोर गडगडली. श्रीनाथने या डावात ८ विकेट्स घेतल्या. पण अन्वरच्या नाबाद १८८ धावांच्या जोरावर पाकिस्तानने ३१६ धावा करण्यात यश मिळवले आणि भारताला २७९ धावांचे आव्हान दिले.
भारताने दुसऱ्या डावाची शानदार सुरुवात केली. सदागोपन रमेश(४०) आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने(६७) १०८ धावांची सलामी भागीदारी केली. तो या सामन्याचा चौथा दिवस होता. मात्र त्यांची भागीदारी तुटल्यानंतर भारताने विकेट्स गमावायला सुरुवात केली. भारत १४३ धावांवर २ बाद अशा चांगल्या स्थितीत असताना आणि मैदानावर सचिन आणि द्रविड या जोडी फलंदाजी करत असतानाच नकोशी घटना घडली.
त्या डावाच्या ४३ व्या षटकात पाकिस्तानचा त्यावेळीच्या कर्णधार अक्रम गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर सचिनने डिप मिड विकेटच्या दिशेने चेंडू फटकावला. त्यावेळी तिसरी धाव घेत असताना नदीम खान चेंडू पकडत स्टंपच्या दिशेने चेंडू फेकला. यावेळी अख्तर फलंदाजाकडे पाठ करुन चेंडू पकडण्यासाठी स्टंपच्या बाजूला उभा राहिला. पण त्याचवेळी त्याची आणि सचिनची धडक झाली आणि त्याचवेळी चेंडूही थेट स्टंपला लागला.
तेव्हा मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तिसरे पंच केटी फँसिस यांनी त्यांचा वेळ घेतला आणि सचिनला धावबाद घोषित केले. कारण रिप्लेमध्ये दिसत होते की सचिनची बॅट हवेत असून तो क्रिजमध्ये पोहचलेला नाही. तसेच अख्तर आणि सचिन मुद्दामहुन धडकले नसल्याचे दिसले. त्यामुळे स्टेडियममध्ये गोंधळाला सुरुवात झाली.
सचिननेही आधी टीव्ही अंपायरच्या रुममध्ये जाऊन त्याच्या विकेटचा व्हिडिओ पाहिला होता. त्याने हा व्हिडिओ पाहून केवळ मान हलवली. सचिनला बाद दिल्याच्या निर्णयाने चिडलेल्या प्रेक्षकांनी बॉटल्स आणि अन्य गोष्टी मैदानावर टाकायला सुरुवात केली. त्यामुळे त्यादिवसाचे दुसरे सत्र लवकर संपवण्यात आले आणि खेळाडूं पुन्हा ड्रेसिंग रुममध्ये परतले. त्यावेळी आयसीसी अध्यक्ष असलेले जगमोहन दालमियांसह सचिननेही वैयक्तिकरित्या प्रेक्षकांना शांत राहण्याी विनंती केली.
अखेर ६७ मिनिटांच्या व्यत्ययानंतर पुन्हा सामना सुरु झाला खरा पण भारताने कर्णधार मोहम्मद अझरुद्दिन आणि द्रविड यांच्या विकेट्स गमावल्या. त्यादिवशी अखेरपर्यंत भारतीय संघ २१४ धावांवर ६ बाद अशा स्थितीत होता. तसेच सौरव गांगुली आणि अनिक कुंबळे नाबाद खेळत होते.
दुसऱ्या दिवशी स्थानिक वृत्तपत्रांमध्येही छापून आले की अक्रमने खिलाडूवृत्ती दाखवत सचिनला खेळू द्यायला हवे होते. यावर सामना संपल्यावर अक्रमने जाहीर टिकाही केली होती.
५ व्या दिवशी ४ विकेट्स हातात असताना आणि भारताला विजयासाठी ६५ धावांची गरज होती. मात्र गांगुलीने त्या दिवसाच्या ९ व्या चेंडूवर विकेट गमावली. तर श्रीनाथ आणि कुंबळेनेही काही वेळात विकेट्स गमावल्या. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांनी बॉटल्स, फळे आणि अन्य गोष्टी फेकण्यास सुरुवात केली. तसेच वृत्तपत्रे जाळण्यात आली. त्यामुळे पुन्हा खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. याचवेळी पोलिसांनी प्रेक्षकांना स्टेडियममधून हाकलण्यास सुरुवात केली.
या सगळया गोष्टीला ३ तास लागले. अखेर रिकाम्या स्टेडियममध्ये सामना पुन्हा सुरु झाला आणि पुढच्या १० चेंडूंनंतर प्रसादला अख्तरने त्रिफळाचीत करत भारताचा डाव संपवला. भारताला या सामन्यात ४६ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. या सामन्यानंतर २ वर्षे कोलकातामध्ये सामना झाला नव्हता.
ट्रेंडिंग लेख –
कसोटी सामन्यात दोन्ही डावात भोपळाही न फोडणारे १० खेळाडू
हे आहेत जगातील सध्याचे घडीचे ४ सर्वोत्तम गोलंदाज
ड्रीम ११ अनेक पाहिल्या असतील, पण रोहित- विराटला घेऊन केलेली अशी ड्रीम ११ नक्कीच नाही