गॉल : श्रीलंका आणि भारतामध्ये होणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारी सुरवात होणार आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसापासूनच भारत सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न करेल. घरच्या मैदानावर खेळत असून सुद्धा श्रीलंकेवर दबाव असेल, कारण नुकत्याच पार पडलेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेत अतिटतीने १-० असा विजय मिळवता आला. शिवाय मागील एक वर्षात या संघाने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केलेली नाही.
२०१५ मध्ये जेव्हा विराट कोहलीचा संघ गॉलच्या मैदानावर कसोटी सामना खेळला होता तेव्हा त्यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण त्यानंतर या भारतीय संघाने मागे वळून पहिले नाही आणि २०१६-१७ मध्ये वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध १७ कसोटी सामन्यात १२ विजय मिळवले आहेत. तर रवी शास्त्रीच्या प्रशिक्षकपदी नाट्यमय निवडीनंतर भारतीय संघाच्या खेळावर याचा कसा परिणाम होतो याकडे ही सर्वांचे लक्ष असेल.
भारतीय संघाला आजाराच्या रुपात सामन्याआधीच झटके बसले आहेत, आधी मुरली विजय आणि आता के एल राहुल दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकणार आहेत. त्यामुळे संघात कमबॅक करणाऱ्या शिखर धवन आणि अभिनव मुकुंदवर सलामीची जबाबदारी पडली आहे. तर यजमान संघही अडचणीत अडकलेला आहे, श्रीलंका संघाचा कर्णधार दिनेश चंडिमल निमोनियामुळे पहिला सामना खेळणार नाही.
मागील पाच सामन्यांचे निकाल:
श्रीलंका – विजय, अनिर्णित, विजय, हार, हार, हार.
भारत – विजय, अनिर्णित, विजय, हार, विजय
महत्वाचे खेळाडू:
भारत
आर अश्विन – आपल्या कारकिर्दीतील ५० वा कसोटी सामना अश्विन गॉलच्या मैदानावर खेळणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देणारी असणार आहे त्यामुळेच भारताला अश्विन कडून अधिक अपेक्षा आहेत. तसेच अश्विन आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे म्हणूनच फलंदाजीच्या खालच्या फळीत भारताला त्याच्या कडून अपेक्षा असतील.
श्रीलंका
रंगना हेराथ – आयसीसीच्या गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि श्रीलंकेचा कर्णधार असेल्या हेराथकडून श्रीलंकेला अधिक अपेक्षा असणार आहेत. हेराथला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळी पूर्ण करण्यासाठी फक्त १६ विकेट्सची गरज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ४०० हून अधिक विकेट घेणारा तो २ रा श्रीलंकन गोलंदाज आणि जगातला १४ वा गोलंदाज बनेल.
संभाव्य संघ
भारत: विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अभिनव मुकुंद, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा,कुलदीप यादवने, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), उमेश यादव, भुवनेश्वर कुमार.
श्रीलंका: रंगना हेराथ (कर्णधार ), दिमुठ करुणरत्ने, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, आसेला गुणरत्ने, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), दन्तर्र्जय डी सिल्वा, कुशल परेरा, सुरनगा लाकमलचा, लाहिरू कुमार, नुवान प्रदीप.
सामन्याबद्दलचा अंदाज:
भारत हा सध्या कसोटी क्रिकेटमध्ये प्रथम स्थानी आहे तर श्रीलंका ७ व्या स्थानी आहे. संगकारा आणि जयवर्धने सारख्या दिग्ज खेळाडूंची जागा भरून काढणे अजूनही युवा खेळाडूंना जमलेले नाही. तर भारतीय संघाच्या युवा पिढीने सचिन आणि द्रविड यांची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळेच या ही मालिकेत भारत जिंकेल असे दिसून येते.
PC: ESPNCricinfo