भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवार, 2 ऑगस्ट रोजी खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांनी 230-230 धावा केल्या, ज्यामुळे सामना बरोबरीत सुटला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जर सामना टाय झाला तर सामनावीराचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? त्यासाठी ही बातमी वाचा.
भारत-श्रीलंका सामना टाय झाल्यानंतर श्रीलंकेचा खेळाडू डुनिथ वेलालागे याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. वेललागेनं या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. त्यानं प्रथम फलंदाजी करताना आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढलं आणि 230 अशी सन्माननीय धावसंख्या गाठून दिली. एक वेळ अशी होती, जेव्हा श्रीलंकेच्या 5 विकेट गमावून 101 धावा झाल्या होत्या, तेव्हा वेलालागेनं 67 धावांची शानदार खेळी केली. यानंतर गोलंदाजीतही त्यानं रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 8 गडी गमावून 230 धावा केल्या. ही खेळपट्टी फिरकीला अनुकूल होती, ज्यावर टिकून राहणे फलंदाजांसाठी सोपं नव्हतं. असं असतानाही वेल्लालागेनं 65 चेंडूंत 7 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकारांच्या मदतीनं नाबाद 67 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय सलामीवीर पथुम निसांकानंही अर्धशतक झळकावलं. भारताकडून अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी 2-2 विकेट्स घेतल्या.
231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मानं टीम इंडियाला झंझावाती सुरुवात करून दिली. रोहितनं पहिल्या 10 षटकांमध्ये वर्चस्व गाजवत 47 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 58 धावा केल्या. मात्र, हिटमॅन बाद झाल्यानंतर भारताचा धावांचा वेग मंदावला आणि हळूहळू श्रीलंकेच्या गोलंदाजांनी आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली. टीम इंडिया 47.5 ओव्हरमध्ये 230 धावांवर ऑलआऊट झाली आणि सामना टाय झाला. मालिकेतील दुसरा सामना याच मैदानावर 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.
हेही वाचा –
जिंकता-जिंकता गंडली टीम इंडिया, असलंकानं 2 चेंडूत केला गेम; भारत-श्रीलंका सामन्याचा अनपेक्षित निकाल
“हातातला सामना गमावला”, रोहित शर्मानं या खेळाडूवर फोडलं खापर, पाहा कर्णधार नेमकं काय म्हणाला?
ओपनर रोहितचा भीम पराक्रम! सचिन-सेहवागच्या खास क्लबमध्ये केली एंट्री