येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ एकाचवेळी दोन देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळणार आहे. एक भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून दुसरा भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे देण्यात आले असून या संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. पाच वर्षात पहिल्यांदाच भारतीय संघ विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंशिवाय परदेश दौरा करेल. त्यामुळेच या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. याच निमित्ताने या दौऱ्यात संघाची योजना काय असेल आणि कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल, हे या लेखातून जाणून घेऊया.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या २० खेळाडूंची घोषणा केली. आणि या संघाचा प्रशिक्षक द्रविड असेल हेसुद्धा बीसीसीआयने स्पष्ट केले. या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शिखर धवनकडे देण्यात आली आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ३ एकदिवसीय सामने आणि ३ टी२० सामने खेळणार आहे. या श्रीलंका दौऱ्यावर काही नवीन गोष्टी पाहण्यास मिळतील.
नवा संघ: विराट कोहलीच्या नेतृत्वातील संघ संध्या इंग्लंडमध्ये आहे. या खेळाडूंच्या अनुपस्थितीत बीसीसीआयने दुसरा भारतीय संघ पाठवण्याचे नियोजन केले केले आहे. एकाच वेळेच भारतीय संघ कसोटी सामने आणि मर्यादित षटकांचे सामने खेळतील. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात भारताचा नवा संघ पाहायला मिळेल.
नवीन कर्णधार: विराट कोहली इंग्लंडमध्ये असल्याने भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यानिमित्त शिखर धवनच्या रुपात नवीन कर्णधार मिळाला आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात धवन ४०वा कर्णधार ठरेल. हा डावखुरा सलामीवीर फलंदाज पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधारपद भूषवणार आहे.
नवीन प्रशिक्षक: भारतीय संघाची ‘भिंत’ म्हणून ओळख असणारा राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका निभवणार आहे. द्रविडकडे प्रशिक्षकपदाचा चांगला अनुभव आहे. आजवर त्याने खूप युवा खेळाडू घडवले आहेत. श्रीलंका दौऱ्यावर जाणारे हे खेळाडू सुरुवातीपासून द्रविडकडून धडे घेत आले आहेत. द्रविडने या अगोदर २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचे थोड्या कालावधीसाठी प्रशिक्षकपद सांभाळले होते.
नवीन खेळाडू: भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्यासाठी संघात युवा खेळाडूंचा भरणा केला आहे. यामध्ये देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, कृष्णप्पा गौतम आणि चेतन सकारियासारख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
या खेळाडूंच्या प्रदर्शनावर एक नजर टाकूया-
१) देवदत्त पडिक्कल: डावखुरा फलंदाज पडिक्कलने गेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये ७३७ धावा केल्या होत्या. पडिक्कलने ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमध्ये लागोपाठ ४ शतक मारण्याचा विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये आरसीबी संघातून खेळणारा पडिक्कलने यंदाच्या मोसमात १ शतकसुद्धा मारले आहे.
२) ऋतुराज गायकवाड: ऋतुराजने ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ५८ सामने खेळले आहेत. ४८.८७ च्या सरासरीने त्याने आजवर २६८१ धावा केल्या आहेत. ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नई संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने १३ आयपीएल सामन्यात ५ अर्धशतक मारले आहे.
३) नितीश राणा: नितीश राणाने ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ४१.२७ च्या सरासरीने १९४० धावा केल्या आहेत. राणा आयपीएलमध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स संघासाठी प्रतिनिधित्व करतो .
४) कृष्णप्पा गौतम: यंदाच्या आयपीएलमध्ये चन्नई सुपर किंग्स संघाने गौतमला ९.२५ करोड रुपयात विकत घेतले. ‘अ’ दर्जाच्या गौतमने ४७ सामन्यात ७० गडी बाद केले आहे. तसेच देशांतर्गत होणाऱ्या टी-२० स्पर्धेतसुद्धा त्याने प्रभावी कामगिरी केली आहे.
५) चेतन सकारिया- २३ वर्षीय चेतनचे आयपीएलमुळे आयुष्यचं बदलून गेले. राजस्थान संघाने चेतनला १.२ करोड रुपयात विकत घेतले. आयपीएलमध्ये केलेल्या प्रदर्शनामुळे चेतनला श्रीलंका दौऱ्यासाठी निवडण्यात आले आहे. त्याने ७ आयपीएल सामन्यात ६ गडी बाद केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
भारतीय संघातील या खेळाडूच्या जीवावर युवराज सिंग आपल्या प्राणाची बाजी लावण्यास तयार
भारतीय संघासाठी टी२० क्रिकेटच्या बाबतीत श्रीलंकेचा दौरा अगदी सोपा; पाहा ‘ही’ आकडेवारी