भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (2 ऑगस्ट) खेळला गेला. हा सामना टाय झाला आहे. या सामन्यात श्रीलंकेनं भारताला विजयासाठी 231 धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात, भारतीय संघ 47.5 षटकांत 230 धावांवर ऑलआऊट झाला.
भारताला विजयासाठी 1 धाव करायची होती आणि दोन विकेट शिल्लक होत्या. पण कर्णधार चारिथ असलंकानं दोन चेंडूत दोन विकेट घेत सामना बरोबरीत आणला. असलंकानं 48व्या षटकातील चौथ्या चेंडूवर शिवम दुबेला बाद केलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्यानं अर्शदीप सिंगलाही एलबीडब्ल्यू बाद केलं. अर्शदीपनं रिव्ह्यू घेतला, पण तो फेल झाला. असलंका व्यतिरिक्त वानिंदू हसरंगानंही श्रीलंकेसाठी चमकदार कामगिरी केली. हसरंगानं भारताचे तीन गडी बाद केले.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 12.4 षटकात 75 धावांची भागीदारी केली. या भागीदारीत गिलचं योगदान विशेष राहिलं नाही. त्यानं 16 धावा करण्यासाठी 35 चेंडू घेतले. मात्र दुसरीकडे रोहित पूर्ण फॉर्मात होता. त्यानं अवघ्या 33 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केले. फिरकीपटू डुनिट वेलल्गेनं गिलला बाद करून ही भागीदारी मोडली. काही वेळाने वेललगेनं रोहितलाही एलबीडब्ल्यू आऊट केलं. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरला (5) विशेष काही करता आलं नाही. अकिला धनंजयनं बाद केलं.
यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी झाली. दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते आणि दोघेही चांगली खेळी खेळणार असल्याचे दिसत होतं. पण वानिंदू हसरंगनं विराट कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट करून ही भागीदारी तोडली. कोहलीनं 32 चेंडूत 24 धावा केल्या, ज्यात 2 चौकारांचा समावेश होता. कोहलीपाठोपाठ श्रेयस अय्यर (23) ही पॅव्हेलियनमध्ये परतला. असिथा फर्नांडोनं बोल्ड केलं. श्रेयस बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 132 धावा होती. येथून केएल राहुल आणि अक्षर पटेल यांनी हुशारीनं फलंदाजी केली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. केएल राहुल 31 धावा करून वानिंदू हसरंगाचा बळी ठरला. तर अक्षर पटेल (33) याला श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकानं बाद केलं.
या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत आठ गडी गमावून 230 धावा केल्या. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली आणि तिसऱ्या षटकातच अविष्का फर्नांडोची विकेट गमावली. फर्नांडो अवघी एक धाव घेतल्यानंतर मोहम्मद सिराजच्या चेंडूवर अर्शदीपकडे झेलबाद झाला. श्रीलंकेनं 14व्या षटकात शिवम दुबेच्या चेंडूवर यष्टिरक्षक फलंदाज कुसल मेंडिसची (14) विकेट गमावली. कुसल मेंडिस बाद झाला तेव्हा श्रीलंकेची धावसंख्या 46 धावा होती. श्रीलंकेला लवकरच तिसरा धक्का बसला. सदिरा समरविक्रमाला अवघ्या 8 धावा करून अक्षर पटेलच्या चेंडूवर शुबमन गिलकडे झेलबाद झाला.
श्रीलंकेच्या संघाला कर्णधार चारिथ असलंकाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, पण त्यानं निराशा केली. तो वैयक्तिक 14 धावांवर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचा बळी ठरली. असलंका बाद झाल्यानंतर काही वेळातच पथुम निसांकानं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. निसांका (56) मोठी खेळी खेळणार, असं वाटत होतं, मात्र तो वॉशिंग्टन सुंदरचा चेंडू नीट वाचू शकला नाही आणि त्याला एलबीडब्ल्यू आऊट व्हावं लागले.
101 धावांत पाच गडी बाद झाल्यानंतर, ड्युनिथ वेलालागे आणि जेनिथ लियानागे यांनी श्रीलंकेची जबाबदारी सांभाळली आणि सहाव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. लियानागे 20 धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला. यानंतर अर्शदीप सिंगनं 24 धावांची तुफानी खेळी खेळणाऱ्या वानिंदू हसरंगाची विकेट घेतली.
हसरंगा बाद झाल्यानंतर दुनिथ वेललगेनं अकिला धनंजय (17) सोबत आठव्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे श्रीलंकेचा संघ सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरला. वेलल्गेनं 65 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 67 धावा केल्या. तर पथुम निसांकानं 75 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीनं 56 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
हेही वाचा –
ओपनर रोहितचा भीम पराक्रम! सचिन-सेहवागच्या खास क्लबमध्ये केली एंट्री
कर्णधार रोहित शर्मा बनला ‘सिक्सर किंग’, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुणालाही मोडता येणार नाही हा विक्रम!
अति घाई, पव्हेलियनमध्ये नेई…! श्रीलंकेचा फलंदाज बाद नसतानाही माघारी परतला, नेमकं काय घडलं?