---Advertisement---

आज मुंबईत होणार भारत-विंडीज निर्णायक टी२० सामना, जाणून घ्या सर्वकाही…

On: बुधवार, डिसेंबर 11, 2019 11:32 AM
---Advertisement---

मुंबई। आज(11 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे. हा सामना मुबंईच्या वानखेडे मैदानावर होईल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सरुवात होईल.

भारत – वेस्ट इंडिज संघात सुरु असलेल्या या टी20 मालिकेत सध्या पहिल्या 2 सामन्यांनंतर 1-1 अशी बरोबरी झाली असल्याने आज होणारा सामना निर्णायक ठरणार आहे.

मागील दोन सामन्यात भारताला खराब क्षेत्ररक्षण आणि साधारण गोलंदाजीचा फटका बसला आहे. त्यामुळे आता त्या कमतरतेवर मात करुन भारतीय संघाला आज मैदानात उतरावे लागेल.

या मालिकेतील हैदराबाद येथे झालेला पहिला सामना भारताने कर्णधार विराट कोहलीने केलेल्या नाबाद 94 धावांच्या खेळीच्या जोरावर जिंकला होता. तर तिरुअनंतपुरममध्ये झालेला दुसरा टी20 सामना जिंकून वेस्ट इंडिजने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.

तसेच भारतीय संघात युवा ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर आणि यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत खराब फॉर्मशी झुंज देत आहेत. त्यामुळे आता आज मुंबईत होणाऱ्या निर्णायक तिसऱ्या टी20 सामन्यात संघ व्यवस्थापन सुंदरला आणखी एक संधी देते की चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याला संधी मिळणार हे पहावे लागेल.

तसेच मागील अनेक दिवसांपासून बेंचवर बसलेल्या संजू सॅमसनलाही आज खेळण्याची संधी मिळणार का हे देखील पहावे लागेल.

सुंदरने शेवटच्या पाच टी20 सामन्यांत फक्त तीन विकेट्स घेतल्या आहेत. वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन टी20 सामन्यात आणि बांगलादेशविरूद्ध तीन टी20 सामन्यात त्याने 23 षटकांत 144 धावा  धावा दिल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन टी20 सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही.

कर्णधार कोहलीला भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाचीही चिंता असेल. मागील 2 सामन्यात भारतीय खेळाडूंंकडून अनेक झेल सुटले आहेत.

तसेच भारताला गोलंदाजीचीही चिंता असेल. अनेक महिन्यांनंतर भारताच्या संघात पुनरागमन केलेल्या भुवनेश्वर कुमारला मागील दोन्ही सामन्यात विकेट घेण्यात अपयश आले आहे. तसेच दीपक चाहरने सुरुवातीला विकेट मिळवली असली तरी त्याने दोन्ही सामन्यात खूप धावा दिल्या आहेत. 

पण असे असले तरी भारतासाठी त्यांची फलंदाजी ही संघाची ताकद आहे. तसेच भारतीय संघात असलेल्या रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांचे मुंबई हे घरचे मैदान आहे.

रोहित आणि अय्यर मागील दोन सामन्यात मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. मात्र दुबेने दुसऱ्या टी20मध्ये आक्रमक अर्धशतक करत त्याचे नाणे खणखणीत वाजवले आहे. त्यामुळे आता या मुंबईकर खेळाडूंची आजच्या सामन्यात घरच्या मैदानावर कशी कामगिरी होणार हे पहाणे औस्तुक्याचे ठरेल.

दुसरीकडे वेस्ट इंडीजचीही नजर मालिका विजयाकडे असेल. त्यांच्या वरच्या फळीतील फलंदाज, विशेषत: लेंडल सिमन्स उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. इविन लुईस, निकोलस पूरन आणि शिमरॉन हेटमायर यांनीही या टी20 मालिकेत चांगली खेळी केली आहे.

गोलंदाजांमध्ये शेल्डन कॉट्रेल, केसरीक विल्यम्स, लेगस्पिनर हेडन वॉल्श आणि जेसन होल्डर यांनी पहिल्या टी20 सामन्यात केलेल्या चूका सुधारत दुसऱ्या टी20 सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांच्याकडून तिसऱ्या टी20 सामन्यातही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. 

याबरोबरच वेस्ट इंडिजलाही भारताप्रमाणेच संघाच्या क्षेत्ररक्षणाची समस्या सतावत आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ त्यात कशी सुधारणा करणार हे पहावे लागले.

मुंबई टी20 सामन्यासाठी यातून निवडले जातील 11 जणांचे संघ –

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, संजू सॅमसन, रिषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

वेस्ट इंडीज – कायरन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऐलन, ब्रॅंडन किंग, दिनेश रामदिन, शेल्डन कॉट्रेल, एव्हिन लुईस, शेरेफेन रुदरफोर्ड, शिमरॉन हेटमायर, खॅरी पियर, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, हेडन वॉल्श ज्युनियर, कीमो पॉल आणि केसरीक विल्यम्स.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---