भारताचा वेस्ट इंडिज दौरा (WIvsIND) आतापर्यंत उत्तम राहिला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत संघाने उत्तम कामगिरी केली आहे. संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये शुबमन गिल याला संघात जागा मिळाली. या संधीचे सोने करत त्याने अनुक्रमे ६४ आणि ४३ धावा केल्या आहेत. यामुळे सलामीला रोहित शर्माची कमी जाणवली नाही.
श्रेयस अय्यर याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत विराट कोहली (Virat Kohli) याची, तर अक्षर पटेलने रवींद्र जडेजाची कमी जाणवू दिली नाही. पुढच्या वर्षी भारतात वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे, मात्र त्याआधी एका खेळाडूच्या फॉर्मने संघाच्या चिंतेत वाढ केली आहे. हा खेळाडू आहे भारतीय संघाचा मि.३६० डिग्री फलंदाज अर्थातच सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). तो टी२०मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे, पण वनडेमध्ये तो काहीसा मागे पडताना दिसत आहे.
वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात वनडे मालिकेच्या संघात सूर्यकुमारचा समावेश आहे. त्याने रविवारी (२४ जुलै) झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात ९ धावा करताच विकेट गमावली होती. त्याला कायले मेयर्सने त्रिफळाचीत केले होते. तसेच तो पहिल्या वनडे सामन्यातही १३ धावा करताच बाद झाला होता. त्यावेळीही त्याला अकिल होसेनने त्रिफळाचीत केले होते. इंग्लंड दौऱ्यातही तो वनडे मालिकेत लवकरच बाद झाला होता. या दौऱ्यात पहिल्या वनडे सामन्यात त्याच्यावर फलंदाजी करण्याची वेळ आली नाही, तर दुसऱ्या वनडेमध्ये रिस टोपलीने त्याला २७ धावांवर त्रिफळाचीत केले होते. तिसऱ्या वनडेतही त्याने १६च धावा करत विकेट गमावली होती.
सूर्यकुमार ज्याप्रकारे बाद होतो त्याची संघाला चिंता सतावत आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या वनडेत त्याने ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर शॉट खेळण्याच्या नादात विकेट गमावली आहे. त्याच्या बॅटची कड घेऊन तो चेंडू स्टम्पला लागला. अशा पद्धतीने बाद होण्याची त्याची काही ही पहिलीच वेळ नाही. त्याने वनडेतील मागील ४ डावांत तिसऱ्यांदा अशी विकेट गमावली आहे.
या महिन्याच्या सुरूवातीला इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही सुर्यकुमार असाच काहीसा बाद झाला होता. त्याने वेगवान गोलंदाज रीस टोपली (Reece Topley) विरुद्ध शॉट खेळण्याच्या नादात त्रिफळाचीत होत विकेट गमावली होती. तो चेंडू पण ऑफ स्टम्पच्या बाहेर होता. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातही हुसैनने त्याच्या या कमजोरीचा फायदा उठवत विकेट काढली. सूर्यकुमारने मागील ५ सामन्यात फक्त एकदाच २०च्या पुढे धावा केल्या आहेत.
मागील वर्षी श्रीलंकेविरुद्ध पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमारने आतापर्यंत १२ सामन्यांमध्ये २ अर्धशतके करत ३३२ धावा केल्या आहेत. तर १९ आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये १ शतक आणि ४ अर्धशतके करत ५३७ धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडीजविरुद्धची टी-२० सीरीजही नाही खेळणार केएल राहुल? रोहितसोबत ‘हे’ फलंदाज करतील ओपनिंग
वाढदिवस विशेष- जॉन्टी रोड्सबद्दल या ५ मनोरंजक गोष्टी माहित आहेत का?
आता सगळ्यांना तोंड फुटलंय! विराटवर टीका करणाऱ्यावंर सीएसकेचा खेळाडू भडकला