राजकोट। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला आहे.
या सामन्यात भारताने विंडिजचा पहिला डाव 181 धावांवर संपुष्टात आणला होता. त्यामुळे भारताने पहिल्या डावात 468 धावांची भक्कम आघाडी घेतल्याने विंडिजला फॉलोआॅन दिला.
परंतू पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही विंडिजची फलंदाजी 196 धावात कोलमडली. त्यांनी दुसऱ्या डावाची सुरुवात सावध केली होती. परंतू प्रभारी कर्णधार ब्रेथवेटने 10 धावांवर असतानाच विकेट गमावली.
पण त्यानंतर कायरन पॉवेल आणि शाय होप यांनी विंडीजचा डाव सांभाळत दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी रचली. पण ही रंगणारी भागीदारी मोडण्यात कुलदीप यादवला यश आले. त्याने होपला 17 धावांवर असताना पायचीत बाद केले.
त्यानंतर मात्र अन्य फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट गमावल्या. विंडिजच्या फलंदाजांपैकी फक्त पॉवेलने चांगली लढत दिली. त्याने 93 चेंडूत 83 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले.
मात्र त्याला डावातील 36 व्या षटकात चौथ्या चेंडूवर कुलदीप यादवने पृथ्वी शॉकडे झेल देण्यास भाग पाडले. यावर शॉनेही कोणती चूक न करता पॉवेलचा अचूक झेल टिपला.
पॉवेल व्यतिरिक्त अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. अन्य फलंदाजांपैकी शिमरॉन हेटमेयर(11), रोस्टन चेस(20), शेन डॉवरीच(16), किमो पॉल(15), देवेंद्र बिशू(9) आणि शेनॉन गॅब्रियलने(1) धावा केल्या.
भारताकडून कुलदीप यादवने 57 धावांत सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर अन्य गोलंदाजांपैकी आर अश्विन(2/71) आणि रविंद्र जडेजा(3/35) यांनी विकेट घेतल्या.
तत्पुर्वी विंडिजने तिसऱ्या दिवसाची सुरुवात पहिल्या डावात 6 बाद 94 धावांवरुन केली होती. पण तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच विंडिजचा पहिला डाव 181 धावांवर संपुष्टात आणण्यात भारताला यश आले.
विंडीजकडून या डावात रोस्टन चेस आणि किमो पॉल यांनी चांगली लढत दिली होती. चेसने 79 चेंडूत 53 धावा करताना 8 चौकार मारले. तर पॉलने 47 धावांची खेळी केली.
या डावात भारताकडून आर आश्विन(4/37), मोहम्मद शमी(2/22), उमेश यादव(1/20), रविंद्र जडेजा(1/22) आणि कुलदीप यादव(1/62) यांनी विकेट्स घेतल्या.
भारताने या सामन्यात कर्णधार विराट कोहली(139), युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ(134) आणि रविंद्र जडेजा(100*) यांनी केलेल्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 9 बाद 649 धावांचा डोंगर उभा केला होता.
संक्षिप्त धावफलक-
भारत पहिला डाव- 9 बाद 649 धावा (घोषित)
विंडिज पहिला डाव – सर्वबाद 181 धावा
विंडिज दुसरा डाव – सर्वबाद 196 धावा
महत्वाच्या बातम्या-
–कुलदीप यादवचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कहर कारनामा
-टाॅप ५- उद्यापासून सुरु हेत असलेल्या प्रो-कबड्डीमधील मजेशीर आकडेवारी
-पहिल्या कसोटी सामन्यासाठी आॅस्ट्रेलिया संघाची घोषणा, तब्बल ३ खेळाडू करणार पदार्पण