भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना 6 जुलै (शनिवार) रोजी हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात यजमान झिम्बाब्वेनं 13 धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघाला विजयासाठी 20 षटकांत अवघ्या 116 धावांचं लक्ष्य होतं. मात्र शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील अननुभवी संघाला हे लक्ष्यही गाठता आलं नाही. भारतीय संघ 19.5 षटकांत 102 धावांवर ऑलआऊट झाला.
झिम्बाब्वेविरुद्ध टी20 मध्ये भारतीय संघाचा हा केवळ तिसरा पराभव आहे. या पराभवासह भारतीय संघाची टी20 मधील विजयी मालिका संपुष्टात आली आहे. तसेच, या वर्षातील टी20 आंतरराष्ट्रीय मधील भारताचा हा पहिला पराभव आहे. सामन्याच्या शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 16 धावा करायच्या होत्या. ते षटक तेंडाई चतारानं टाकले. त्या षटकात विजयाची जबाबदारी वॉशिंग्टन सुंदरवर होती, पण तो केवळ 2 धावाच करू शकला आणि पाचव्या चेंडूवर तो बाद झाला.
भारतीय संघाच्या पराभवाचं मुख्य कारण म्हणजे फलंदाजांची खराब कामगिरी. अव्वल फळीतील फलंदाजांपैकी फक्त कर्णधार शुबमन गिल काही काळ क्रीजवर राहू शकला. गिलनं 31 धावांची खेळी खेळली. गिलशिवाय आवेश खान (16) आणि वॉशिंग्टन सुंदर (27) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. नवोदित खेळाडू ध्रुव जुरेल, रियान पराग आणि अभिषेक शर्मा यांनी निराशा केली. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझा आणि तेंडाई चतारानं प्रत्येकी तीन बळी घेतले. तर ब्लेसिंग मुझाराबानी, ब्रायन बेनेट, ल्यूक जोंगवे आणि वेलिंग्टन मसाकादजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
टी20 विश्वचषक 2024 चं विजेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या तीन दिग्गजांनी निवृत्ती घेतली. त्यानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच सामना होता. या मालिकेसाठी हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या अनुपस्थित शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करतोय.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 9 गड्यांच्या मोबदल्यात 115 धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेसाठी क्लाईव्ह मदंडेनं 29 धावांची नाबाद खेळी खेळली. त्यानं 25 चेंडूंचा सामना केला, ज्यात 4 चौकार मारले. याशिवाय डिओन मायर्सनं 23 धावांचं, ब्रायन बेनेटनं 22 धावांचे आणि वेस्ली मधवेरेनं 21 धावांचं योगदान दिलं. या चौघांशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारताकडून फिरकीपटू रवी बिश्नोईनं सर्वाधिक 4 बळी घेतले.
या सामन्यात अभिषेक शर्मा, ध्रुव जुरेल आणि रियान पराग यांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबाद कडून चमकदार कामगिरी करणारा अभिषेक शर्मा आणि राजस्थान रॉयल्स कडून खेळणारा रियान पराग यांची प्रथमच भारतीय संघात निवड झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषक ट्रॉफी कोणत्या धातूची बनली असते? ट्रॉफीचं वजन किती असतं? जाणून घ्या सर्वकाही
भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ! अवघ्या काही क्षणांत अख्खं स्टेडियम हाऊसफुल्ल
झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक आहेत शुबमन गिलचे फॅन, भारतीय कर्णधारावर केला कौतुकाचा वर्षाव