यावर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात विंडीजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातील एक वनडे सामना कोची ऐवजी तिरुअनंतपूरमला घेण्याच्या निर्णयाला केरळ क्रिकेट असोसिएशनने मान्य केले आहे.
हा निर्णय गुरुवारी सकाळी क्रीडा मंत्री एसी मोईडीन आणि केरळ क्रिकेटचं असोसिएशनचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आला. केरळ क्रिकेट असोसिएशनने कोचीमध्ये हा सामना घेण्याची जोरदार मागणी केली होती. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. पण आता हा वाद जास्त न वाढवण्यासाठी त्यांनी सामना तिरुअनंतपुरमला घेण्याचे मान्य केले आहे.
याबद्दल केरळ क्रिकेट असोसिएशनचे सचिव जयेश जार्ज म्हणाले, ” सरकारने केलेल्या विनंतीनुसार आम्ही तिरुअनंतपुरमला भारत विरुद्ध विंडीज संघांचा वनडे सामना घेण्याचा प्राथमिक निर्णय घेतला आहे.पण या प्रकरणाचा अंतिम निर्णय केरळ क्रिकेट असोसिएशनच्या सर्वसाधारण समितीने मान्यता दिली की घेतला जाईल. “
तसेच ते असेही म्हणाले की सरकार कोचीमध्ये आंतराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी पुढाकार घेईल असे सरकारने त्यांना सांगितले आहे.
कोचीमध्ये जर क्रिकेटचा सामना घेतला तर तिथे असलेले फुटबॉलचे मैदान खराब होईल. कोचीमध्ये आयएसएलचे केरला ब्लास्टर्स या संघाचे घरचे सामने घेण्यात येतात. त्यामुळे क्रिकेट सामना कोचीमध्ये घेण्यासाठी केरला ब्लास्टर्सचा सहसंघमालक सचिन तेंडुलकर, एटलेटिको डी कोलकाता संघाचा सहसंघमालक सौरव गांगुली, भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी याला विरोध दर्शवला होता.
विंडीजचा संघ भारताविरुद्ध या दौऱ्यात ३ कसोटी, ५ वनडे आणि १ टी २० सामना खेळणार आहे. त्यातील टी २० सामना कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडिअमवर होणार आहे.