ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील दुसरा सामना (बॉक्सिंग डे कसोटी) मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर २६ डिसेंबरपासून खेळला जाईल. यजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा दणदणीत पराभव करत १-० ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढेल, असे म्हटले आहे. तसेच उर्वरीत मालिकेत भारताला लाल चेंडूने खेळण्याचा फायदा होईल, असेही आगरकर याने सांगितले.
भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पत्करावा लागला पराभव
बॉर्डर-गावसकर मालिकेची सुरुवात ऍडलेड येथील दिवस- रात्र कसोटीने झाली. ही कसोटी गुलाबी चेंडूने खेळली गेली होती. भारताला या कसोटीत ८ गड्यांनी लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ पॅट कमिन्स व जोश हेजलवूड यांच्या गोलंदाजीपुढे अवघ्या ३६ धावांत ढेपाळला. ही भारताची आजवरची सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. ऍडलेड कसोटी भारताची अवघी दुसरी दिवस-रात्र कसोटी होती.
भारताला होईल लाल चेंडूने फायदा
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू राहिलेल्या अजित आगरकरने एका मुलाखतीत भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेसंदर्भात अनेक प्रश्नांवर चर्चा केली. त्यातील एका प्रश्नावर बोलताना आगरकर म्हणाला, “मला वाटते उर्वरित मालिकेत भारताला विजयाची संधी आहे. कारण मालिकेतील बाकी सामने लाल चेंडूने खेळवले जाणार आहेत. गुलाबी चेंडूने खेळण्याचा भारताकडे पुरेसा अनुभव नाही. ही भारतीय संघासाठी एकदम वेगळी गोष्ट होती. आता बाकी सामने हे दिवसा लाल चेंडूने खेळवले जाणार असल्याने, भारतीय संघाला त्याचा फायदा होईल.”
भारतीय संघासमोर निर्माण झाल्या आहेत समस्या
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघासमोरील अडचणीत अजून वाढ झाली आहे. नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला, तर अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त होऊन उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. युवा खेळाडूंनी संघ व्यवस्थापनाला पूर्णपणे निराश केलेले दिसून येते. त्यामुळे मालिकेतील राहिलेल्या तीन सामन्यात नवा कर्णधार अजिंक्य रहाणेपुढे अनेक आव्हाने असतील.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ धुरंधर खेळाडू बनला तामिळनाडूचा कर्णधार; टी२० स्पर्धेत करणार नेतृत्त्व
माजी भारतीय दिग्गजाने निवडला भारत- ऑस्ट्रेलियाचा संयुक्त कसोटी संघ; विराटला दिला डच्चू