अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅ़डलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवला आहे. तसेच चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात पाचव्या दिवशी(10 डिसेंबर) आॅस्ट्रेलियाने 4 बाद 104 धावांपासून खेळायला सुरुवात केली. पण सुरुवातीच्या काही वेळातच ट्रेविस हेडला इशांत शर्माने 14 धावांवर असताना बाद केले. हेडचा झेल गलीमध्ये उभ्या असणाऱ्या अजिंक्य रहाणेने घेतला.
त्यानंतर शॉन मार्श आणि आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने डाव सावरत सहाव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी रचली. पण ही जोडी तोडण्यात जसप्रीत बुमराहला यश आले. त्याने मार्शला 60 धावांवर असताना बाद केले. बुमराहने टाकलेला चेंडू मार्शच्या बॅटची कड घेऊन सरळ यष्टीरक्षक रिषभ पंतकडे गेला.
यानंतर पहिल्या सत्रात नाबाद असणारा आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच 41 धावांवर बाद झाला. त्याला बुमराहनेच बाद केले.
पेन बाद झाल्यानंतर मात्र पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्कने डाव सांभाळताना 8 व्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी रचताना आॅस्ट्रेलियाला विजयाच्या स्पर्धेत कायम ठेवले होते. पण ही जोडी मोहम्मद शमीने तोडली. त्याने स्टार्कला 28 धावांवर असताना बाद केले.
त्यानंतर काही वेळाने बुमराहने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या कमिन्सलाही 28 धावांवर असतानाच बाद केले. कमिन्सचा झेल स्लिपमध्ये उभ्या असणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने घेतला.
अखेर जोश हेजलवूड(13) आणि नॅथन लायन(38*) यांनी शेवटच्या विकेटसाठी भारताच्या गोलंदाजांना चांगलीच झुंज द्यायला लावली होती. पण शेवटी आर अश्विनने हजलवूडला बाद करत भारताला विजय मिळवून दिला.
भारताकडून मोहम्मद शमी(3/65), जसप्रीत बुमराह(3/68), इशांत शर्मा(1/48) आणि आर अश्विनने(3/92) विकेट्स घेतल्या.
या सामन्यात भारताने चेतेश्वर पुजाराने केलेल्या 123 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 250 धावांची मजल गाठली होती. त्यानंतर आॅस्ट्रेलियाला मात्र त्यांच्या पहिल्या डावात 235 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून ट्रेविस हेडने 71 धावांची अर्धशतकी खेळी केली, तर भारताकडून बुमराह आणि अश्विनने सर्वाधिक प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावात भारताकडून पुजारा आणि अजिंक्य रहाणेने अनुक्रमे 71 आणि 70 धावांची अर्धशतकी खेळी केल्या. त्यामुळे भारताने दुसऱ्या डावात 307 धावा करत पहिल्या डावातील 15 धावांच्या आघाडीसह आॅस्ट्रेलिया समोर 323 धावांचे आव्हान ठेवले. पण आॅस्ट्रेलियाला 119.5 षटकात 291 धावाच करता आल्या.
संक्षिप्त धावफलक:
भारत पहिला डाव – सर्वबाद 250 धावा
आॅस्ट्रेलिया पहिला डाव – सर्वबाद 235 धावा
भारत पहिला डाव – सर्वबाद 307 धावा
आॅस्ट्रेलिया पहिला डाव – सर्वबाद 291 धावा
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच असा इतिहास घडवण्याची विराट कोहलीच्या टीम इंडियाला संधी
–Video: आॅस्ट्रेलियन चाहत्यांकडून आपमान झाल्यानंतरही विराट कोहलीने दाखवली खिलाडूवृत्ती
–Video: आॅस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आऊट होणार हे या दिग्गजाने आधीच ओळखलं!