गयाना। आयसीसी महिला टी20 विश्वचषकात रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने मिताली राजच्या अर्धशतकाच्या जोरावर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या स्पर्धेतील त्यांचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे.
या सामन्यात पाकिस्तान महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांसमोर 134 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली.
मिताली राज आणि स्म्रीती मानधनाने 73 धावांची सलामी भागीदारी रचली. पण 10 व्या षटकात बिस्माह मारुफने स्म्रीतीला 26 धावांवर खेळत असताना बाद केले.
त्यानंतर 18 वर्षीय जेमिमा रोड्रीगेजने(16) मितालीला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची भागीदारी रंगत असतानाच पाकिस्तानची गोलंदाज निदा दारने स्वत:च्याच गोलंदाजीवर जेमिमाचा झेल घेत तिला बाद केले.
यानंतर काही वेळातच चांगल्या लयीत खेळणाऱ्या मितालीला डायना बेगने बाद केले. पण तोपर्यंत भारत विजयाच्या नजीक पोहचला होता. मितालीने या सामन्यात आक्रमक खेळताना 47 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली.
मिताली बाद झाल्यावर कर्णधार हरमनप्रीत कौर(14*) आणि वेदा कृष्णमुर्तीने(8*) विकेट न गमावता उर्वरित आव्हान सहज पार करत 19 व्या षटकातच भारताला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी पाकिस्तानकडून बिस्माह मारुफ आणि निदा दारने अर्धशतकी खेळी केली होती. बिस्माहने 49 चेंडूत 4 चौकार मारताना 53 धावांची तर निदा दारने 35 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह आक्रमक 52 धावांची खेळी केली.
या दोघींनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानला 20 षटकात 7 बाद 133 धावा करण्यात यश आले. या दोघींव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही.
अन्य फलंदाजांपैकी ओमिमा सोहेल(3), जवेरिया खान(17) आणि आलिया रियाज(4) यांनींच धावा केल्या.
भारतीय क्षेत्ररक्षकांकडून या सामन्यात दोन धावबादही पहायला मिळाले. ओमिमा सोहेल आणि जवेरिया खान या दोघीही धावबाद झाल्या.
भारताकडून दयालन हेमलता (2/34), पुनम यादव (2/22) आणि अरुंधती रेड्डी(1/24) यांनी विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या:
–शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत टीम इंडियाचा विंडीजला व्हाइटवॉश
–चारच धावा केल्या तरी कर्णधार रोहित शर्माने केला हा खास विक्रम
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १४- परिपूर्णतेचा ध्यास घेतलेला शापित






