दक्षिण आफ्रिका महिला संघाने दुसऱ्या टी २० सामन्यात भारतीय महिला संघासमोर विजयासाठी २० षटकात १४३ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून अनुजा पाटील आणि पूनम यादव या दोघींनी प्रत्येकी २ विकेट्स घेऊन महत्वाची कामगिरी बजावली.
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २० षटकात ७ बाद १४२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली होती. मात्र सलामीवीर फलंदाज लिझेल ली(१५) लवकर बाद झाली. तिच्या पाठोपाठ काही वेळातच मागील सामन्यात चांगली कामगिरी करणारी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन व्हॅन निएकर्कनेही(१५) आपली विकेट गमावली.
त्यानंतर लगेचच मिग्नॉन द्यू प्रीझ(११) आणि मॅरिझन कॅपनेही(२) आपल्या विकेट बहाल केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था ४ बाद ५८ धावा अशी झाली. यानंतर सून लूस(३३) आणि नादिन डे क्लर्कने(२६) चांगली लढत देऊन डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याही ४३ धावांच्या भागीदारी नंतर एकापाठोपाठ बाद झाल्या.
अखेरच्या काही षटकात क्लो ट्रायऑन(१५) आणि शबनीम इस्माइल(१६*) यांनी आक्रमक खेळ करत दक्षिण आफ्रिकेला १४० धावांचा टप्पा गाठून दिला. ट्रायऑन अखेरच्या षटकात बाद झाली.
भारताकडून अनुजा पाटील(२/३७), पूनम यादव(२/१८), पूजा वस्त्रकार(१/३०) आणि शिखा पांडे (१/२६) यांनी विकेट्स घेतल्या.