---Advertisement---

AUSvsIND: टी20 मालिका निर्णायक सामन्यात टीम इंडियाने मारली बाजी, यजमान 17 धावांनी पराभूत

On: शनिवार, फेब्रुवारी 21, 2026 5:45 PM
---Advertisement---

मालिका निर्णायक सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध धमाकेदार कामगिरी केली आहे. तीन सामन्यांची ही टी२० मालिका भारताने २-१ अशी जिंकली. या मालिकेतील शेवटचा सामना आज (२१ फेब्रुवारी) ऍडलेड ओव्हलवर खेळला गेला. त्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला १७७ धावांचे लक्ष्य दिले होते. हा सामना भारताने १७ धावांनी जिंकला. यावेळी स्म्रीती मंधनाची खेळी उल्लेखनीय ठरली. तिलाच या सामन्याचा ‘प्लेयर ऑफ द मॅच’ची पुरस्कार मिळाला. भारताचा हा ऐतिहासिक विजय ठरला आहे.

या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीवेळी भारताची सुरूवात चांगली झाली नाही. शेफाली वर्मा ७ धावा करत बाद झाली. त्यानंतर स्म्रीती मंधनाने जेमीमा रॉड्रिग्जच्या साहाय्याने संघाचा धावफलक हलता ठेवला. दोघींनी पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. मंधना ८२ धावा करत बाद झाली. तिने ५५ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकार मारले.

तसेच जेमीमाने ५९ धावा केल्या. त्यामुळे भारताने २० षटकात ६ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून चांगली कामगिरी ऍनाबेल सुथरलंडने केली. तिने ४ षटकात ३४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तिने स्म्रीती आणि जेमीमाच्या विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना यजमानांची सुरूवात अडखळत झाली. त्यांनी ३.३ षटकात पहिल्या तीन विकेट्स ३२ धावसंख्येवरच गमावल्या. त्यांच्याकडून सर्वाधिक धावा अ‍ॅशले गार्डनरने केल्या. तिने ४५ चेंडूत ५७ धावा केल्या. भारताकडून श्रीचरणी आणि श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. अरुधंती रेड्डीने २ आणि रेणुका सिंग ठाकुरने एक विकेट घेतली.

हा भारताचा ऑस्ट्रेलियातील १० वर्षांनंतरचा पहिलाच टी२० मालिका विजय ठरला आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने २१ धावांनी जिंकला आणि दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने १९ धावांनी जिंकला होता. या दौऱ्यात तीन वनडे सामन्यांची मालिका आणि एकमेव कसोटी सामना खेळला जाणार आहे.

वनडे मालिकेतील पहिला सामना २४ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---