शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023मधील पहिला उपांत्य सामना भारतीय महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात पार पडला. सेनवस पार्क येथे खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 8 विकेट्सने न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. तसेच, भारतीय संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक दिली. या सामन्यात केलेल्या कामगिरीसाठी भारतीय संघाची महिला गोलंदाज पार्शवी चोप्रा हिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात भारतीय महिला (India Women) संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंड महिला (New Zealand Women) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 107 धावा केल्या होत्या. हे आव्हान भारतीय संघाने 14.2 षटकात 2 विकेट्स गमावत 110 धावा चोपल्या आणि पूर्ण केले.
#TeamIndia march into the Finals of the #U19T20WorldCup.
They become the first team to reach the finals of the inaugural #U19T20WorldCup 💪💥👏
Way to go #WomenInBlue! pic.twitter.com/4H0ZUpghkA
— BCCI Women (@BCCIWomen) January 27, 2023
भारतीय महिला संघाकडून फलंदाजी करताना सलामीवीर श्वेता सेहरावत हिने सर्वाधिक धावा चोपल्या. तिने 45 चेंडूत नाबाद 61 धावा चोपल्या. या धावा करताना तिने तब्बल 10 चौकारांचीही बरसात केली. तिच्याव्यतिरिक्त सौम्या तिवारी (22), कर्णधार शेफाली वर्मा (10) आणि गोंगाडी त्रिशा (5) यांनीही संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
यावेळी न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना ऍना ब्राऊनिंग हिलाच फक्त विकेट्स घेण्यात यश आले. तिने भारताच्या दोनही फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या. तिने 3.2 षटके गोलंदाजी करताना 18 धावा देत 2 विकेट्स खिशात घातल्या.
तत्पूर्वी न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना जॉर्जिया पीमर हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने 32 चेंडूत 35 धावा केल्या. या धावा करताना तिने 2 चौकारही मारले. तिच्याव्यतिरिक्त इसाबेला गेझ (26), कर्णधार इझी शार्प (13) आणि कायली नाईट (12) यांनी संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. मात्र, त्यांच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाने 2 आकडी धावसंख्या पार केली नाही. त्यामुळे न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही.
यावेळी भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना पार्शवी चोप्रा (Parshavi Chopra) हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. यावेळी तिने 4 षटके गोलंदाजी करताना 20 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त तितास साधू, मन्नत कश्यप, शेफाली वर्मा, अर्चना देवी यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
हा पहिलाच 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक आहे. त्यामुळे भारतीय संघाने अंतिम सामन्यात धडक मिळवण्याचा मान पटकावला आहे. या विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात शुक्रवारीच खेळला जाणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल, तो भारतीय संघाविरुद्ध अंतिम सामना खेळेल.
या विश्वचषकातील अंतिम सामना रविवारी (दि. 29 जानेवारी) सेनवस पार्क येथे खेळला जाणार आहे. (India Women U19 won by 8 wkts against New Zealand Women and take place in u19 women world cup final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मनोरंजन क्षेत्रात एमएस धोनीची एन्ट्री, ‘असा’ आहे पहिल्या सिनेमाचा पोस्टर
विराटच्या फॉर्मची दादाला चिंता! म्हणाला, “त्याच्यावर संघ अवलंबून असताना…”