केपटाऊन। भारतीय महिला संघाने पाचव्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात ५४ धावांनी विजय मिळवून ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-१ ने विजय मिळवला आहे. भारताकडून मिताली राजने अर्धशतक केले तर शीखा पांडे, राजेश्वरी गायकवाड आणि रुमेली धरने प्रत्येकी ३ विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी २० षटकात १६७ धावांचे आव्हान ठेवले होते . परंतु दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांकडून विशेष कामगिरी झाली नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या डावात आज मॅरिझन कॅपने केलेली २७ धावांची खेळी सर्वोच्च ठरली. तसेच कॅप व्यतिरिक्त क्लो ट्रायऑन(२५), डेन व्हॅन निएकर्क(१०) आणि मिग्नॉन डू प्रीझ(१७) यांनीच दोन आकडी धावा केल्या.
अन्य फलंदाजांनी विशेष काही केले नाही . अन्य फलंदाजांपैकी लिझेल ली(३),सून लुस(५), नादिन डे क्लर्क(४), शबनिम इस्माईल(८),मसाबाता क्लास(९), आयबॉन्ग खाका(१) आणि रायसिब तोझखे(०*) यांनी धावा केल्या.
भारताकडून शिखा पांडे(३/१६), रुमेली धर(३/२६),राजेश्वरी गायकवाड (३/२६)आणि पूनम यादव(१/२५) यांनी विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला १८ षटकातच ११२ धावांवर सर्वबाद केले.
तत्पूर्वी भारताने २० षटकात ४ बाद १६६ धावा केल्या. भारताकडून अफलातून फॉर्म मध्ये असणारी मिताली राजने आज या टी २० मालिकेतील तिसरे अर्धशतक करताना ५० चेंडूत ६२ धावांची खेळी केली. यात तिने ८ चौकार आणि ३ षटकार मारले. सलामीवीर फलंदाज स्म्रिती मानधना(१३) आज लवकर बाद झाली.
ती बाद झाल्यानंतर मितालीला भक्कम साथ दिली ती जेमिमा रोड्रिगेज या १७ वर्षीय खेळाडूने. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची दमदार भागीदारी केली. मात्र मितालीला शबनिम इस्माईलने बाद करत ही जोडी फोडली. जेमिमाने मितालीची साथ देताना ३ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ३४ चेंडूत ४४ धावा केल्या.
अखेरची काही षटके बाकी असताना मिताली आणि जेमिमा बाद झाल्याने हरमनप्रीत कौर(२७*) आणि वेदा कृष्णमूर्थीने(८) भारताला १६६ धावांचा टप्पा गाठून दिला. वेदा अखेरच्या चेंडूवर धावबाद झाली.
दक्षिण आफ्रिकेकडून आयबॉन्ग खाका(१/४१), मॅरिझन कॅप(१/२२) आणि शबनिम इस्माईल(१/३५) यांनी विकेट्स घेतल्या.
आज मिताली राजला या सामन्यासाठी सामनावीर आणि मालिकेतील उत्तम कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.