होव। भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी (११ जुलै) इंग्लंड महिला संघाविरुद्ध टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ८ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ बरोबरी झाली आहे. दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय महिला संघाकडून शानदार सांघिक खेळ पाहायला मिळाला. भारताच्या दिप्ती शर्माला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू निवडण्यात आले. तिने नाबाद २४ धावा करण्याबरोबरच १ विकेट घेतली. त्याचबरोबर तिने २ फलंदाजांना धावबाद करण्यात योगदान दिले.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर विजयासाठी २० षटकांत १४९ धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला २० षटकात ८ बाद १४० धावाच करता आल्या.
इंग्लंडची १४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवात खराब झाली होती. त्यांनी सलामीला फलंदाजीला आलेल्या डॅनिएल वॅटची विकेट दुसऱ्याच षटकात गमावली. त्याच्यापाठोपाठ नताली सिव्हरदेखील तिसऱ्या षटकात केवळ १ धावेवर धावबाद झाली. पण यानंतर टॅमी ब्यूमॉन्टने कर्णधार हिदर नाईटला साथीला घेत संघाचा डाव सावरला. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी केली. त्यामुळे एकावेळी हा सामना इंग्लंड सहज जिंकेल असे वाटले होते.
पण ब्यूमॉन्ट आणि नाईटची जोडी दिप्ती शर्माने तोडली. तिने अर्धशतकी खेळी केलेल्या ब्यूमॉन्टला पायचीत केले. ब्यूमॉन्टने इंग्लंडकडून ५० चेंडूत सर्वाधिक ५९ धावांची खेळी केली. तिच्यापाठोपाठच्या चेंडूवर लगेचच दिप्तीने नाईटलाही ३० धावांवर बाद करत भारताला सामन्यात पुनरागमन करुन दिले. या दोघी बाद झाल्यानंतर केवळ यष्टीरक्षक फलंदाज एमी एलेन जोन्सला दोन आकडी धावसंख्या पार करता आली. त्याव्यतिरिक्त एकही फलंदाज आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडला विजय मिळवून देऊ शकली नाही.
भारतीय महिला संघाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या महिलांना १४० धावांवरच रोखले. भारताकडून पुनम यादवने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर अरुंधती रेड्डी आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी १ विकेट घेतली. इंग्लंडच्या ४ क्रिकेटपटू धावबाद झाल्या.
तत्पूर्वी इंग्लंडची कर्णधार नाईटने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताकडून सलामीला स्म्रीती मंधना आणि शेफाली वर्माने दमदार सुरुवात केली. या दोघींनीही सलामीला ५३ चेंडूत ७० धावांची भागीदारी रचली. दरम्यान, शेफालीने डावाच्या चौथ्या षटकात आक्रमक पवित्रा घेत सलग ५ चौकार ठोकले. पण तिचे अर्धशतक केवळ २ धावांनी हुकले. ती ३८ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह ४८ धावा करुन बाद झाली. तिच्याआधी १६ चेंडूत २० धावांवर मंधना माघारी परतली होती.
या दोघी बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने आक्रमक खेळताना २५ चेंडूत ३१ धावा केल्या. यात तिने २ चौकार आणि २ षटकार ठोकले. तिला दिप्ती शर्माने संयमी साथ दिली. त्यानंतर रिचा घोष ८ धावांवर माघारी परतली. पण अखेर दिप्ती आणि स्नेह राणाने नाबाद राहात भारताला २० षटकात ४ बाद १४८ धावा उभारुन दिल्या. दिप्तीने २७ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या. तर राणा ८ धावांवर नाबाद राहिली. इंग्लंडकडून नताली सिव्हर, फ्रेया दाव्हिस, साराह ग्नेन आणि मॅडी व्हिलियर्स यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
या सामन्यात भारतीय महिलांनी विजय मिळवलेला असल्याने आता १४ जुलै रोजी चेम्सफर्ड येथे होणारा तिसरा आणि अखेरचा सामना निर्णायक ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विम्बल्डनचा अंतिम सामना पाहाण्यासाठी ‘देसी गर्ल’ची उपस्थिती, पाहा फोटो
विम्बल्डन २०२१ चे विजेतेपद जिंकत जोकोविचने रचला इतिहास; नदाल, फेडररच्या २० ग्रँडस्लॅमची केली बरोबरी






