India Women Won Test: भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघातील एकमेव कसोटी सामन्याचा निकाल रविवारी (दि. 24 डिसेंबर) चौथ्या दिवशी लागला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे रंगलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने 8 विकेट्स राखून विजय मिळवला. यासह भारतीय महिला संघाने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना जिंकत इतिहास घडवला.
भारताने सहज पार केले आव्हान
या सामन्यात भारतीय महिला (India Women) संघाला विजयासाठी 75 धावांचे आव्हान मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सलामीला शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना (Smriti Mandhana) उतरल्या होत्या. यावेळी भारताला शेफालीच्या रूपात पहिला धक्का खूपच लवकर बसला. शेफाली 4 धावा करून पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर एलिसा हिलीच्या हातून झेलबाद झाली. त्यानंतर रिचा घोष हिने फलंदाजीला येत 13 धावांचे योगदान दिले. पुढे जेमिमा रॉड्रिग्जने स्मृतीची साथ दिली. स्मृतीने (38) विजयी चौकार मारत सामन्याचा शेवट केला आणि भारताला सहजसोपा विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 261 धावांवर संपुष्टात
ऑस्ट्रेलिया महिला संघाने दुसऱ्या डावात 105.4 षटके फलंदाजी करताना सर्व विकेट्स गमावत 261 धावा केल्या होत्या. यावेळी त्यांच्याकडून ताहलिया मॅकग्रा हिने सर्वाधिक 73 धावा केल्या होत्या. तिच्याव्यतिरिक्त एलिस पेरी (45), बेथ मूनी (33) आणि कर्णधार एलिसा हिली (32) यांनाच 30 धावांचा आकडा पार करण्यात यश आले. इतर एकही फलंदाज खास प्रदर्शन करू शकली नाही.
भारताकडून गोलंदाजी करताना स्नेह राणा (Sneh Rana) चमकली. तिने यावेळी सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त राजेश्वरी गायकवाड आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, पूजा वस्त्राकर एक विकेट घेण्यात यशस्वी ठरली.
पहिल्या डावात भारत 400 धावांच्या पार
त्यापूर्वी भारतीय महिला संघाने पहिल्या डावात 400 धावांचा आकडा पार केला होता. भारताने 126.3 षटकात 10 विकेट्स गमावत 406 धावा केल्या होत्या. यावेळी भारताकडून चौघींनी अर्धशतके झळकावली. त्यात दीप्ती शर्मा (78), स्मृती मंधाना (74), जेमिमा रॉड्रिग्ज (73) आणि रिचा घोष (52) यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त सलामी फलंदाज शेफाली वर्मा हिनेही 40 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. कर्णधार हरमन 0 धावांवर तंबूत परतली. मात्र, इतर खेळाडूंच्या विस्फोटक खेळीमुळे भारताला समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यश आले.
यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ऍशले गार्डनर हिने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त किम गार्थ आणि एनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, जेस जोनासन हिनेही 1 विकेट नावावर केली.
ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 219 वर सर्वबाद
ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात खास कमाल करता आली नाही. त्यांनी ताहलिया मॅकग्रा (50), बेथ मूनी (40) आणि एलिसा हिली (38) यांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर 77.4 षटकात सर्व विकेट्स गमावत 219 धावांपर्यंत मजल मारली. किम गार्थ 28 धावा करून नाबाद राहिली. तिच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज 20 धावांचा आकडाही पार करू शकली नाही.
यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना पूजा वस्त्राकरने चमकदार कामगिरी केली. तिने सर्वाधिक 4 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. तसेच, स्नेह राणानेही 3 विकेट्स घेतल्या. तसेच, दीप्ती शर्मा 2 विकेट्स घेण्यात यशस्वी राहिली.
हेही वाचा-
बोंबला! IND vs SA पहिल्या कसोटीत पावसाची शक्यता, क्यूरेटरच्या विधानाने वाढू शकतात टीम इंडियाच्या अडचणी
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन महिला 261वर All Out, भारतीय रणरागिणी इतिहास घडवण्यापासून ‘एवढ्या’ धावा दूर