सध्या न्यूझीलंड येथे महिला क्रिकेट विश्वचषक (Womens Cricket World Cup 2022) खेळला जात आहे. दिग्गज फलंदाज मिताली राज (Mithali Raj) हिच्या नेतृत्वात उतरलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवत स्पर्धेची शानदार सुरुवात केली. ६ मार्च रोजी झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा १०७ धावांनी दणदणीत पराभव केला. भारतीय संघ आता आपला दुसरा सामना यजमान न्यूझीलंडविरुद्ध (NZvIND) गुरुवारी (१० मार्च) खेळेल. या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याचे लक्ष भारतीय संघाचे असेल.
पहिल्या सामन्यात मिळवला सोपा विजय
माऊंट मॉन्गुई येथे झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना स्मृती मंधाना, स्नेह राणा व पूजा वस्त्राकार यांच्या योगदानाच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gayakwad) हिच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानचा संघ पुरता नामोहरम झाला. भारतीय संघाने पाकिस्तानवर तब्बल १०७ धावांनी विजय मिळवून पाकिस्तान विरुद्ध विश्वचषकात कधीही पराभूत न होण्याचा विक्रम कायम ठेवला.
न्यूझीलंडविरुद्ध लागणार कस
भारत आणि न्यूझीलंड सामन्यात भारतीय संघासमोर विजयाचे मोठे आव्हान असेल. विश्वचषकापूर्वी उभय संघांमध्ये झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात यजमान संघाला पराभूत करण्यासाठी भारतीय संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.
इंग्लंडमध्ये झालेल्या २०१७ विश्वचषकात हे दोन्ही संघ समोरासमोर आले होते. त्यावेळी भारतीय संघाने विजय संपादन केलेला. कर्णधार मिताली राजचे शतक व राजेश्वरी गायकवाड हिच्या पाच बळींच्या जोरावर भारतीय संघाने विजय मिळविला होता. हा सामना जिंकून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी भारत प्रयत्न करेल.
२०२२ महिला क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघ
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.
स्टँडबाय खेळाडू: एस. मेघना, एकता बिश्त, सिमरन दिल बहादूर.
महत्वाच्या बातम्या-
हरभजन की अश्विन, कोणाची गोलंदाजी सर्वात जास्त घातक? दिग्गज फलंदाजाने दिले उत्तर (mahasports.in)
नव्या कसोटी क्रमवारीत जडेजा नंबर वन! पंत-विराटही फायद्यात (mahasports.in)