बीसीसीआयने आज पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. या संघात भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीचा दुखापतीमुळे समावेश करण्यात आलेला नाही.
तिच्या ऐवजी २४ वर्षीय सुकन्या परिदाला भारतीय संघात संधी मिळाली आहे. तिने नोव्हेंबर २०१६ मध्ये विंडीज विरुद्ध आंतराष्ट्रीय पदार्पण केले होते. तसेच तीची फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडलेल्या विश्वचषकाच्या पात्रता फेरीसाठीही निवड झाली होती परंतु दुखापतीमुळे तिला ही स्पर्धा खेळात आलेली नाही. आता पुन्हा एकदा तिचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
गोस्वामीला नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे मालिकेनंतर टाचेची दुखापत झाली होती. त्यानंतर तिला टी २० मालिकेलाही मुकावे लागले होते.
याबरोबरच आज जाहीर झालेल्या भारतीय संघातून तानिया भाटियाला वगळण्यात आहे. त्यामुळे या भारतीय संघात फक्त सुषमा वर्मा ही एकमेव यष्टीरक्षक खेळाडू असेल. तसेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या १७ वर्षीय जेमिमा रोड्रिगेजलाही भारतीय संघात कायम ठेवण्यात आले आहे.
या भारतीय संघाचे कर्णधारपद मिताली राज सांभाळेल तर उपकर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे असेल.
भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात १२ मार्च पासून ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. तसेच ही मालिका आयसीसी वूमेन्स चॅम्पिअन्सशीपचाही भाग असेल. या मालिकेतील सर्व सामने वडोदराला होणार आहेत.
असा आहे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ:
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्म्रिती मानधना, पूनम राऊत, जेमिमा रोड्रिगेज, वेदा कृष्णामूर्थी, मोना मेश्राम, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), एकता बिस्त, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, सुकन्या परिदा, पूजा वस्त्रकार, दीप्ती शर्मा.
अशी असेल वनडे मालिका:
१२ मार्च – पहिला सामना – वडोदरा
१५ मार्च – दुसरा सामना – वडोदरा
१८ मार्च – तिसरा सामना – वडोदरा