भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज (१६ फेब्रुवारी) चौथा दिवस होता. पाहुण्या इंग्लंड संघाने ३ बाद ५३ या धावसंख्येपासून पुढे चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. डोळ्यांपुढे ४२९ धावांचे भलेमोठे लक्ष्य ठेवून इंग्लंडचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानावर उतरले होते. परंतु भारतीय गोलंदाजांनी एका-नंतर-एक विकेट्स काढत ३१७ धावांच्या फरकाने सामना खिशात घातला. यासह ४ सामन्यांची कसोटी मालिका १-१ ने बरोबरीवर आली आहे.
तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने भारताच्या ४८२ धावांचे लक्ष्याचा पाठलाग करताना १९ षटकात ३ बाद महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात फारशी बरी झाली नव्हती. त्यांनी ९ व्या षटकात ३ धावांवर डॉम सिब्लीची विकेट गमावली. त्याची विकेट अक्षर पटेलने घेतली. त्यानंतर रॉरी बर्न्स २५ धावा करुन आर अश्विनच्या गोलंदाजीवर १६ व्या षटकात बाद झाला. त्यापाठोपाठ नाईट वॉचमन म्हणून खेळायला आलेला जॅक लीचला १७ व्या षटकात अक्षरने बाद केले.
त्यानंतर चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला आर अश्विनने डॅनियल लॉरेन्सच्या रुपात इंग्लंडला चौथा धक्का दिला. लॉरेन्स ५३ चेंडूत फक्त २६ धावांवर पव्हेलियनला परतला. लॉरेन्स मागोमाग बेन स्टोक्सलाही त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवले. अश्विनबरोबर पदार्पणवीर अक्षर पटेलनेही दमदार गोलंदाजी प्रदर्शन केले. त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रुटसोबत ऑली स्टोन आणि ऑली पोप यांना तंबूत धाडले. तर कुलदीप यादवनेही २ महत्त्वाच्या विकेट्स चटकावल्या.
इंग्लंडकडून एकटा अष्टपैलू मोईन अली ४० पेक्षा जास्त धावा करू शकला. त्याने १८ चेंडूत ५ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. परंतु इतर फलंदाजांना जास्त धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव १६४ धावांवरच संपुष्टात आला. परिणामत भारताने ३०० हून अधिक धावांच्या फरकाने विजयी पताका झळकावली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘माझा नवराच सर्वांना ट्रोल करत आहे,’ अश्विनच्या लक्षणीय खेळीनंतर बायकोचं धमाकेदार ट्विट
नागालँडचा एकलव्य..! माजी दिग्गजाचे व्हिडीओ पाहून शिकला गोलंदाजी, आयपीएलचे ‘हे’ संघ बनवणार कोट्याधीश
‘या’ कारणामुळे भारत सध्या जगातील अव्वल संघ, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केले मनभरून कौतुक






