---Advertisement---

इतिहास रचून विराट सेनेचा मालिका विजय!

On: शुक्रवार, फेब्रुवारी 16, 2018 11:46 PM
---Advertisement---

 सेंच्युरियन। भारतीय संघाने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहाव्या वनडे सामन्यात ८ विकेट्सने विजय मिळवून मालिका ५-१ अशी जिंकली आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शतक करून विजयात महत्वाची कामगिरी बजावली. 

दक्षिण आफ्रिकाने भारतासमोर विजयासाठी २०५ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने ३२.१ षटकातच पूर्ण केले. या आव्हानाचा पाठलाग करताना मागच्या सामन्यातील शतकवीर रोहित शर्माच्या(१५) रूपात भारताने पहिली विकेट लवकर गमावली होती. त्यामुळे विराटला डावातील चौथ्याच षटकात मैदानात यावे लागले. 

आज शिखर धवनने विराटची साथ देताना त्याच्या सोबत दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचली. मात्र शिखर आज ३४ चेंडूत १८ धावा करून माघारी परतला. शिखर बाद झाल्यावर अजिंक्य रहाणेने कर्णधाराची भक्कम साथ देण्याची जबाबदारी पार पडली. रोहित आणि शिखर या दोंघांनाही लुंगीसानी एन्गिडीने बाद केले. 

विराट आणि रहाणेने नंतर आणखी पडझड न होऊ देता नाबाद १२६ धावांची भागीदारी रचून भारताला विजय मिळवून दिला. विराटने आज आक्रमक खेळताना अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. विराटने त्याच्या वनडे कारकिर्दीत ३५ वे शतक करताना ९६ चेंडूत १२९ धावा केल्या. या खेळीत त्याने तब्बल १९ चौकार आणि २ षटकार मारले. 

तसेच विराटने आज आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७००० धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला. त्याला साथ देणाऱ्या रहाणेने आज ५० चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. 

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना सुरुवात खराब केली. हाशिम अमला(१०) आणि एडिन मार्करम(२४) हे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले. त्यांच्यानंतर खाया झोन्डोने एकाकी लढत देऊन शानदार अर्धशतक केले. पण त्यालाही त्याचे मोठ्या धावसंख्येचा रूपांतर करण्यात अपयश आले. झोन्डोने ३ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ७४ चेंडूत ५४ धावा केल्या. 

एबी डिव्हिलियर्स(३०) आणि अँडिल फेहलूकवयो(३४) या दोघांनी थोडी लढत देण्याचा प्रयन्त केला. पण तेही खेळपट्टीवर स्थिर झाल्यावर लगेचच बाद झाले. बाकी फलंदाजांनी विशेष काही केले नाही. 

बाकी फलंदाजांमध्ये हेन्रिक क्लासेन(२२),फरहान बेहार्डीन(१), ख्रिस मॉरीस(४),  मोर्ने मॉर्केल(२०), इम्रान ताहीर(२) आणि लुंगीसानी एन्गिडी(०*) यांनी धावा केल्या. भारताकडून शार्दल ठाकुरने ९ षटकांत ५२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह(२/२४), युजवेंद्र चहल(२/३८), हार्दिक पंड्या(३९/१) आणि कुलदीप यादव(१/५१) यांनी विकेट्स घेऊन दक्षिण आफ्रिकेचा डाव ४६.५ षटकात २०४ धावांवर संपुष्टात आणला. 

 

  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment