---Advertisement---

श्रीलंकेला चारीमुंड्या चीत करत टीम इंडियाचा वर्षातील पहिला मालिकाविजय! सूर्या-अर्शदीप चमकले

On: शनिवार, जानेवारी 7, 2023 10:24 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राजकोट येथे तिसरा टी20 सामना खेळला गेला. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा निर्णायक सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरले होते. मात्र, भारतीय संघाने खेळाच्या तिन्ही विभागात श्रीलंकेला 91 धावांनी मात देत सामना खिशात घालत वर्षाची सुरुवात मालिकाविजयाने केली. सूर्यकुमार यादवचे शतक सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.

मुंबई येथील पहिल्या सामन्यात रोमांचक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाला पुणे येथील दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावे लागले. राजकोट येथील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यातही भारताची सुरुवात खराब झाली. ईशान किशन या सामन्यातही लवकर बाद होत तंबूत परतला. मात्र, आपला दुसरा सामना खेळत असलेल्या राहुल त्रिपाठी याने श्रीलंकेवर प्रतिआक्रमण केले. त्याने अवघ्या 16 चेंडूवर 35 धावा कुटल्या.

त्यानंतर मात्र सूर्यकुमार यादव व शुबमन गिल यांनी श्रीलंकन गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. त्यांनी तिसऱ्या गड्यासाठी 111 धावांची भागीदारी केली. गिलने 46 धावांची खेळी केली. मात्र, सूर्यकुमार यादव अखेरपर्यंत नाबाद राहिला. त्याने आपल्या कारकिर्दीतील तिसरे टी20 शतक पूर्ण करत 52 चेंडूवर 112 धावा चोपल्या. अक्षर पटेलने 21 धावांचे योगदान देत भारताला 5 बाद 228 पर्यंत मजल मारून दिली.

या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला 44 धावांची सलामी मिळाली. मात्र, त्यानंतर त्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाने सर्वाधिक 23 धावांची खेळी केली. भारतासाठी अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन तर हार्दिक पंड्या, उमरान मलिक व चहलने प्रत्येकी दोन बळी आपल्या नावे केले. सूर्यकुमार यादव याला सामनावीर तर अक्षर पटेलला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

(India Won Rajkot T20I By 91 Runs Sealed Series By 2-1)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---