---Advertisement---

बांगलादेश नवा विश्वविजेता; १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला दिला पराभवाचा धक्का

On: रविवार, फेब्रुवारी 9, 2020 9:56 PM
---Advertisement---

पोचेफस्टरूम| आज(9 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील विश्वचषकात 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील बांगलादेश संघात सेन्वेस पार्क स्टेडियमवर अंतिम सामना पार पडला. या सामन्यात बांगलादेशने 3 विकेट्सने विजय मिळवत पहिल्यांदाच 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचा इतिहास रचला आहे.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 47.2 षटकात सर्वबाद 177 धावा करत बांगलादेशला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 15 धावांची गरज असताना पावसाला सुरुवात झाली.

अखेर पावसामुळे सामना 46 षटकांचा करण्यात आला आणि 170 धावांचे आव्हान बांगलादेशला देण्यात आले. हे आव्हान बांगलादेशने 42.1 षटकात 7 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.

बांगलादेशकडून परवेझ हुसेन इमोन आणि तान्जिद हसनने चांगली सुरुवात केली होती. त्यांनी 50 धावांची सलामी भागीदारी रचली. पण हसनला रवी बिश्नोईने 17 धावांवर बाद केले. तर त्यानंतर काहीवेळात इमोन डाव्या पायाला क्रॅम्प आल्याने रिटायर्ड हर्ट होऊन 25 धावांवर असताना मैदानाबाहेर गेला.

यानंतर मात्र बिश्नोईच्या गोलंदाजीमुळे बांगलादेशची मधल्या फळीने नांगी टाकली. त्यानंतर केवळ कर्णधार अकबर अलीने एकाकी झुंज दिली. अखेर बांगलादेशने 102 धावांवर 6 विकेट्स गमावल्यावर इमोन पुन्हा फलंदाजीला आला.

त्याने आणि अकबर अलीने बांगलादेश संघाला सावरले आणि 7 व्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी रचली. मात्र इमोनला 47 धावांवर बाद करत यशस्वी जयस्वालने भारताला ब्रेकथ्रू मिळून दिली. यानंतर मात्र रकिबूल हसनने अकबरला चांगली साथ देताना भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही.

भारताकडून गोलंदाजी करताना रवी बिश्नोईने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच सुशांत मिश्रा 2 विकेट्स आणि यशस्वी जयस्वालने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वालने  121 चेंडूत 88 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीमध्ये त्याने 8 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याच्या व्यतिरिक्त केवळ तिळक वर्मा(38) आणि यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव चंद जुरेल(22) यांंनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली आहे. अन्य भारतीय फलंदाज एक आकडी धावसंख्येवरच बाद झाले.

बांगलादेशकडून अविषेक दासने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच शोरीफुल इस्लाम आणि तान्झिम हसन साकिब यांनी प्रत्येकी 2 विकेट्स तर राकिबुल हसनने 1 विकेट घेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---