आजी-माजी क्रिकेटपटूंपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वजण भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेची वाट पाहात आहेत. ५ फेब्रुवारीपासून या मालिकेचा श्रीगणेशा होणार असून चेन्नईच्या एमए चिंदरबरम स्टेडियमवर पहिला सामना रंगणार आहे. तत्पुर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने भारताच्या फिरकीपटूंना चेतावणी दिली आहे. इंग्लंडकडे फिरकी गोलंदाजीसाठी बरेच पर्याय उपलब्ध असल्याने भारतीय फिरकीपटू त्यांना पराभूत करू शकणार नसल्याचे त्याने सांगितले आहे.
चेन्नईची खेळपट्टी फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीसाठी सोईस्कर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अधिकतर वेगवान गोलंदाज या खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसतात. याविषयी बोलताना आर्चर म्हणाला की, “मी येथे इंडियन प्रीमियर लीगदरम्यान बरेच सामने खेळले आहेत. परंतु येथील मैदानांवर प्रथम श्रेणी स्वरुपातील क्रिकेट सामन्यांचा अनुभव मला नाही. त्यामुळे लवकरच लाल चेंडूने गोलंदाजी करण्याचे आव्हान स्पष्ट होईल.”
पुढे बोलताना आर्चर म्हणाला की, “आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना विरोधी संघाचे फलंदाज आक्रमकपणे खेळतात. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज पूर्ण सत्र गोलंदाजांना थकवू शकतात. त्यातही जर खेळपट्टी सपाट असेल तर गोलंदाज हतबल होतो. यामुळे आम्ही अपेक्षा करतो की, खेळपट्टी चांगली असेल जिथे चेंडूला गती मिळेल. किंवा चेंडूला टर्नदेखील मिळाला तर हरकत नाही.”
“जरी या खेळपट्टीवर भारतीय फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली तरीही सामना त्यांच्या बाजूला झुकणार नाही. कारण आमच्याकडेही दमदार फिरकी गोलंदाज उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतीय संघ आम्हाला फिरकी गोलंदाजीच्या जोरावर मात देऊ शकणार नाही”, असे शेवटी आर्चरने सांगितले.
जोफ्रा आर्चरचे फार पुर्वी भारतात आगमन
श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंड संघाचा भाग नसल्याने जोफ्रा आर्चर इतर खेळाडूंपुर्वी भारतात आला होता. त्याच्यासोबत सलमीवीर रॉरी बर्न्स आणि अष्टपैलू बेन स्टोक्स यांचे लवकरच भारतात आगमन झाले होते. त्यानंतर २७ जानेवारी रोजी श्रीलंका दौरा आटोपून इंग्लंडचे इतर खेळाडूही चेन्नईत पोहोचले आहेत.
४ सामन्यांची कसोटी मालिका झाल्यानंतर भारत आणि इंग्लंड संघ मर्यादित षटकांच्या मालिका खेळतील. यात ५ सामन्यांची टी२० मालिका आणि ३ सामन्यांची टी२० मालिका यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऐकावं ते नवलंच! भारतातील ‘या’ दोन क्रिकेट स्टेडियममध्ये आहे गणपतीचे मंदिर
फ्लॅशबॅक! १५ वर्षांपूर्वी इरफान पठाणने पाकिस्तान विरुद्ध घेतली होती हॅट्रिक, पहा व्हिडिओ
‘कसोटी पदार्पणाच्या पहिल्या रात्री खूप नर्वस झालो होतो, झोपीच्या गोळ्या…’, शुबमन गिलचा मोठा खुलासा