IND VS PAK WCL: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना आता अधिकृतपणे होणार नाहीये. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स म्हणजेच WCL च्या सेमीफायनलमध्ये सामना खेळायचा होता, जो आता होणार नाही. भारतीय खेळाडूंनी या सामन्यात खेळण्यास नकार दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच भारतीय संघाचा या स्पर्धेतला प्रवास संपला आहे. याआधीही पाकिस्तानविरुद्ध भारताने सामना रद्द केला होता.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स म्हणजेच WCL च्या सेमीफायनलमध्ये चार संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे, यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त भारत आणि पाकिस्तानचा समावेश आहे. पहिला उपांत्य सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 31 जुलै रोजी होणार होता, पण आता हा सामना होणार नाही. भारतीय खेळाडूंनी या सामन्यात खेळण्यास नकार दिल्याचे कळले आहे. पीटीआयला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की इंडियन चॅम्पियन्स लीगचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी बर्मिंगहॅम येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तान चॅम्पियन्स लीगविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. म्हणजे सामना आता होणार नाही.
याआधी, जेव्हा या स्पर्धेच्या लीग टप्प्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार होता, तेव्हाही भारतीय खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला होता. यानंतर भारत आणि पाकिस्तानला प्रत्येकी एक गुण देण्यात आला. पण आता उपांत्य फेरी असल्याने भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. पण पाकिस्तानी संघ थेट उपांत्य फेरीत जाईल की नाही, त्यासाठी आपल्याला वाट पहावी लागेल. शिखर धवन, हरभजन सिंग, इरफान पठाण, सुरेश रैना आणि युसूफ पठाण इत्यादी खेळाडू पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्यास तयार नाहीत.
दरम्यान, ताज्या घडामोडीत, पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचताच, स्पर्धेचा मुख्य प्रायोजक, इझी माय ट्रिपनेही त्यातून माघार घेतली. या कंपनीचे संस्थापक निशांत पिट्टी आहेत, त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून यावर आपले मत व्यक्त केले आहे. याचा अर्थ असा की स्पर्धेचे भविष्यही आता धोक्यात असल्याचे दिसून येते






