नवी दिल्ली | काश्मीरमधील कुपवाडा जिल्हा हा संवेदनशील जिल्ह्यांपैकी एक मानला जातो. यावर्षी या जिल्ह्यात जुलै महिन्यात अतिरेकी आणि भारतीय सैन्यात झालेल्या चकमकीत दोन अतिरेक्यांचा गोळीबारात मृत्यू झाला होता. त्यामुळे या जिल्ह्यात तणावाचे वातावरण होते. मात्र, असे असूनही भारतीय लष्कराने इथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.
एकूण 24 संघ झाले सहभागी
कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे भारतीय लष्कराच्या वतीने एकता क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. उत्तर काश्मीरमधील रहिवासी आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दहशतवाद्यांशी सतत होणाऱ्या चकमकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हंदवाडामध्ये सुमारे 24 क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
जसिया अख्तरनेही घेतला सहभाग
काश्मीरची प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू जसिया अख्तरनेही या स्पर्धेत भाग घेतला आणि भारतीय सैन्याने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. तिने तरुणांच्या पालकांना अशी विनंती केली की त्यांनी त्यांच्या मुलांना या प्रकारच्या स्पर्धेत पाठवावे जेणेकरुन ते रणजी संघातही चांगली कामगिरी बजावू शकतील.
खेळाडूंनी लष्कराचे केले कौतुक
या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनीही भारतीय लष्कराने केलेल्या कामाचे कौतुक केले आणि सांगितले की, “यामुळे काश्मीर खोऱ्यातील सीमावर्ती जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल.”






