Vikram Rathour On Rohit Sharma Pull Shot: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील कसोटी मालिकेला दिमाखात सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर रंगला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमान संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेत, भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. यानंतर यजमान संघाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजी उद्ध्वस्त केली. कर्णधार रोहित शर्मा यावेळी मोठी खेळी करू शकला नाही. त्याच्या शॉट निवडीवरून चाहत्यांनी टीकास्त्र डागले. आता भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड व्यक्त झाले.
भारतीय संघाची पहिल्या दिवशी खराब स्थिती
भारतीय संघाची पहिल्या दिवशी सुरुवात खूपच खराब झाली. भारताने आपल्या 6 विकेट्स या फक्त 121 धावांवर गमावल्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत यामध्ये आणखी 2 विकेट्स जोडल्या गेल्या. अशाप्रकारे भारताने 8 विकेट्स गमावत 208 धावा केल्या. भारताला 200 धावांचा टप्पा पार करून देण्यात केएल राहुल (KL Rahul) याने मोलाचा वाटा उचलला. तो 70 धावांवर नाबाद आहे. मात्र, या डावातील पहिली विकेट रोहित शर्मा (Rohit Shama) याची पडली होती. तो 14 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 5 धावा करून बाद झाला होता. रोहित त्याचा आवडता पुल शॉट खेळताना बाद झाल्यामुळे भारताला पहिला झटका बसला होता.
रोहित शर्मा पुल शॉट खेळून तंबूत
रोहित शर्मा पुल शॉट (Rohit Sharma Pull Shot) खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करतो, हे रबाडाला माहिती होते. त्यामुळे त्याने योजना आखून एका क्षेत्ररक्षकाला सीमारेषेजवळ उभे केले होते. त्याने चेंडू जसा टाकला, तसा रोहितने पुल शॉट खेळला आणि चेंडू थेट क्षेत्ररक्षक नांद्रे बर्गर याच्या हातात गेला. यामुळे रोहितला अवघ्या 5 धावांवर मैदान सोडावे लागले. यानंतर भारतीय संघाने नियमित अंतराने पुढील विकेट्स गमावल्या.
चाहते नाराज
रोहितच्या या शॉटवर अनेक क्रिकेट तज्ज्ञांसह चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, कसोटीत अशी जोखीम असणारे शॉट खेळण्याची काय गरज आहे? सामन्यादरम्यान समालोचक संजय मांजरेकरही म्हणाले होते की, रबाडाने आधीही रोहितला त्याच्या आवडीच्या शॉटवर बाद केले होते. मात्र, रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या या शॉटवर नियंत्रण ठेवावे लागेल. असाच काहीसा सूर सोशल मीडिया युजर्सचाही आहे.
फलंदाजी प्रशिक्षकाकडून रोहितचे समर्थन
मात्र, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी रोहित शर्माच्या शॉट निवडीचे समर्थन केले. ते म्हणाले की, “पुल शॉट हा एक असा शॉट आहे, ज्यावर रोहितने खूप जास्त धावा केल्या आहेत. त्याला त्या शॉटवर विश्वास आहे की, तो त्याचा शॉट आहे. एखाद्या दिवशी तो शॉट बसतो, एखाद्या दिवशी बसत नाही. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा त्याच शॉटवर षटकार मारला, तर लोक म्हणतील की, तो सर्वोत्तम पुल शॉट खेळणारा फलंदाज आहे. त्यामुळे आम्हाला यात कोणतीही समस्या नाहीये. संघ व्यवस्थापनाचा त्याला पाठिंबा आहे.”
Indian batting coach said "Pull shot is the shot Rohit has scored lots of runs, he believes in – this is his shot, some days it will come off, some days it won't – another day, he will hit a six & we have heard people say he is the best puller, we are okay, management is backing… pic.twitter.com/jxcO3FfUd3
— Johns. (@CricCrazyJohns) December 26, 2023
भारतीय संघाकडून चमकला राहुल
भारतीय संघाची चौथी विकेट 92 धावसंख्येवर श्रेयस अय्यर याच्या रूपात पडली. त्यानंतर केएल राहुल सहाव्या स्थानी फलंदाजीला उतरला. त्याने यावेळी दिवसाचा खेळ संपेपर्यंत टिच्चून फलंदाजी करत सर्वाधिक नाबाद 70 धावा केल्या. राहुलव्यतिरिक्त विराटनेही दुसरे सर्वाधिक 38 धावांचे योगदान दिले, तर श्रेयस अय्यर 31 धावा करून बाद झाला. (indian batting coach vikaram rathore on rohit sharma said about his shot selection pull shot read here)
हेही वाचा-
टीम इंडियाची बॅटिंग पाहून गावसकरांना झाली अजिंक्य रहाणेची आठवण; म्हणाले, ‘जर तो असता, तर आज…’
IND vs AUS । बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस दक्षिण आफ्रिकेच्या नावावर, केएल राहुलमुळे भारत सुस्थितीत