भारतात कोविड-१९ महामारीने हाहाकार माजवला आहे. काही महिन्यांपुर्वी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असताना कोरोनाची दुसरी लाट परसली आणि दिवसेंदिवस या महामारीचा प्रकोप वाढतचं चालला आहे. अगदी मोठमोठे क्रिडापटूही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अशात बॉडीबिल्डिंग विश्वातून (शरीरसौष्ठव) धक्कादायक वृत्त पुढे आले आहे. प्रसिद्ध मराठमोळा शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड याचे आज (३० एप्रिल) कोरोनामुळे निधन झाले आहे.
जगदीश अवघ्या ३४ वर्षांचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. या धक्कादायक घटनेमुळे शरीरसौष्ठव विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. जगदीशला काही दिवसांपुर्वी कोरोनाचे संक्रमण झाले होते. त्यामुळे त्याला चार दिवस ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. मात्र शरीराने धष्टपुष्ट असलेला जगदीश कोरोनावर मात करू शकला नाही आणि अखेर आज त्याची प्राणज्योत मालवली. जगदीशला एक मुलगी आहे.
जगदीश हा मुळचा सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचा होता. परंतु नवी मुंबई येथे तो लहानाचा मोठा झाला. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच तो नवी मुंबईहून बडोदा येथे स्थायिक झाला होता. तेथील युवकांना शरीरसौष्ठवमध्ये रस निर्माण व्हावी म्हणून त्याने स्वत:ची व्यायामशाळाही सुरू केली होती.
जगदीशने शरीरसौष्ठव क्षेत्रात मोठे नाव कमावले होते. वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये त्याने कांस्य पदक जिंकले होते. तर महाराष्ट्र श्री स्पर्धेत जवळपास ४ वेळा आणि मिस्टर इंडिया स्पर्धेत २ वेळा तो सुवर्णपदाकाचा मानकरी ठरला होता. नवी मुंबईतील महापौर श्री स्पर्धेतही तो विजेता ठरला होता. याबरोबरच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
केकेआरविरुद्ध ८२ धावा चोपणाऱ्या पृथ्वीची संघनायकाने केली प्रशंसा; म्हणाला, ‘तो धमाल करु शकतो, फक्त…’
छोटा पॅकेट बडा धमाका! मावीच्या एकाच षटकात सलग ६ चौकार कसे मारले? पृथ्वीने सांगितली ‘राज की बात’
इशानला बाकावर बसवल्याने सार्वकालिन महान फलंदाज नाराज; म्हणाले, “मी असतो तर एक संधी दिली असती”