मुंबई पावसाच्या अडथळ्यानंतर अखेर भारत आणि न्यूझीलंड संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी वानखेडेच्या मैदानावर उतरले आहेत. शुक्रवारपासून (०३ नोव्हेंबर) सुरू झालेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली आहे. त्यामुळे पाहुणा न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करताना दिसेल. हा सामना न्यूझीलंडच्या फिरकीपटू अजाज पटेल याच्यासाठी खूप खास असणार आहे. त्यामागचे कारणही तितकेच खास आहे.
अजाज हा जरी न्यूझीलंड क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व करत असला तरीही तो जन्माने भारतातला आहे. त्यातही भारतातील मुंबई शहरातला त्याचा जन्म आहे आणि भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामनाही मुंबईच्याच मैदानावर होतो आहे. याचमुळेच हा सामना त्याच्यासाठी अतिशय विशेष आहे.
आतापर्यंत केवळ ११ कसोटी सामने खेळलेल्या अजाजचा हा जन्मस्थळ असलेल्या मुंबईतील पहिलाच कसोटी सामना असणार आहे. यासह तो जन्मस्थळी भारताविरुद्ध कसोटी सामना खेळणारा भारतीय वंशाचा केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्यापूर्वी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांनी हा अनोखा असा पराक्रम केला होता. जन्माने मुंबईकर असलेल्या जार्डिन यांनी १९३३ मध्ये मुंबईत भारताविरुद्ध कसोटी सामना खेळला होता.
मुंबई कसोटी खेळण्यापूर्वी अजाज झाला भावुक
महत्त्वाचे म्हणजे, अजाज या सामन्यापूर्वी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. तो या सामन्यापूर्वी ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाला की, ‘आम्ही काल जेव्हा मुंबईत आलो, तेव्हा याबद्दल मी विचार करत होतो. येथे आल्याने छान वाटले. यापूर्वी मी कुटुंबासह सुट्ट्यांमध्ये इकडे आलो आहे. पण यावेळी कारण थोडे वेगळे आहे. यावेळी मी क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईत आलोय.’
तो पुढे स्टेडियमबद्दल बोलताना म्हणाला, ‘मी यापूर्वी अनेक आयपीएल सामन्यांसाठी वानखेडे स्टेडियमवर आलो आहे, त्यासाठी मिशेल मॅक्लेघनचे आभार. मी जेव्हाही येथे आलोय, तेव्हा त्याची मदत मिळाली. मी इथे थोडी गोलंदाजी आणि सरावही केला आहे. त्यामुळे येथे येणे, हे आठवणींना उजाळा देण्यासारखे आहे.’
त्याचे काही कुटुंबिय देखील सामन्यासाठी स्टेडियममध्ये येणार असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, ‘कुटुंबातील सदस्यांसमोर खेळण्याचा दबाव नाही, उलट उत्सुकता आहे. मी सर्व आठवत आहे, जेव्हा मी पहिल्यांदा मुंबई सोडले आणि मुंबईला पहिल्यांदा परत आलो, लग्नसंमारंभासारख्या गोष्टींसाठी येथे येणे. माझ्यासाठी हे क्षण खूप खूप खास असणार आहेत.’
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडच्या जेमिसनचा धोका टाळण्यासाठी माजी भारतीय फलंदाजाचा ‘विराटसेने’ला मजेशीर पण कामाचा सल्ला
दुसऱ्या सामन्यापूर्वी वृद्धिमान साहाच्या फिटनेसबद्दल विराटचे मोठे वक्तव्य, साहाचा देखील खास मेसेज