न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला आहे. त्यानंतर शुक्रवारपासून (०३ डिसेंबर) मुंबई येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. पावसामुळे पहिल्या दिवशीच्या खेळाला विलंब झाला असून १२ वाजता या सामन्याची सुरुवात झाली आहे. या सामन्यापूर्वी माजी भारतीय फलंदाज वसिम जाफर यांनी न्यूझीलंडचा घातक वेगवान गोलंदाज कायल जेमिसन याचा सामना करण्यासाठी भारतीय संघाला मजेदार उपाय सांगितला आहे.
न्यूझीलंडच्या ६ फूट ८ इंच उंचीच्या या गोलंदाजाने मागील कानपूर कसोटीत भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले होते. त्याच्या भेदक गोलंदाजीपुढे भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेचाही टिकाव लागला नव्हता. त्याने पहिल्या आणि दुसऱ्या डावात प्रत्येकी ३ विकेट्स घेत संपूर्ण सामन्यात भारताच्या ६ फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.
पहिल्या डावात त्याने रहाणेसहित भारताची सलामी जोडी, शुबमन गिल आणि मयंक अगरवाल यांना बाद केले होते. तर दुसऱ्या डावात शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि आर अश्विन त्याचे शिकार बनले होते.
त्यामुळे या उंच काठीच्या गोलंदाजाच्या भेदक माऱ्याचा सामना करण्यासाठी माजी रणजीपटू जाफर यांनी भारतीय फलंदाजांना मोलाचा मंत्र दिला आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शैली मजेशीर असे मीम शेअर करत हा सल्ला दिला आहे. एकीकडे जेमिसनसहित न्यूझीलंड संघाला एक फोटो त्यांनी जोडला आहे आणि दुसरीकडे एक कार्टून जोडले आहे. हे मीम शेअर करत त्यांनी कॅप्शन दिले आहे की, ‘जेमिसनचा धोका टाळण्यासाठी एक पद्धत ही असू शकते की, त्याच्या हाईट लिमिटला (उंचीची मर्यादा) वानखेडेतून बाहेरच ठेवले जावे.’
https://twitter.com/WasimJaffer14/status/1466384458152435712?s=20
दरम्यान जेमिसनची भारताविरुद्धची गोलंदाजी कामगिरी अतिशय उल्लेखनीय राहिली आहे. त्याने आतापर्यंत भारताविरुद्ध केवळ ४ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान २.३६ च्या इकोनॉमीने गोलंदाजी करताना त्याने तब्बल २२ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता कानपूर कसोटीनंतर जेमिसन वानखेडेच्या मैदानावर कशी कामगिरी करतो? हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvNZ, 2nd Test, Live: पहिल्या दिवशी ७८ षटकांचा होणार खेळ, ओल्या मैदानामुळे लंचब्रेक लवकर
मोठी बातमी! मुंबई कसोटीतून रहाणे, इशांत, जडेजा, विलियम्सन बाहेर; ‘हे’ आहे कारण
‘तुम्ही माझे आयुष्य बदलले’; ईशानने मुंबईसाठी पोस्ट केला भावनिक व्हिडिओ






