मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. सध्या 5 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिल्या कसोटीत भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियानं शानदार पुनरागमन केलं. दुसऱ्या कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. आता दोन्ही संघ चौथी कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्यानं मैदानात उतरले आहेत.
या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 474 धावा केल्या. भारतासाठी जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. मात्र त्याला इतर गोलंदाजांकडून फारशी साथ मिळाली नाही. बुमराहला इतर गोलंदाजांची साथ न मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. हा ट्रेंड या मालिकेत सातत्यानं सुरू आहे.
जसप्रीत बुमराहला या मालिकेत मोहम्मद सिराज, आकाशदीप, हर्षित राणा, रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी या गोलंदाजांची अजिबात साथ मिळालेली नाही. आकडेवारी देखील हे सिद्ध करते. आकडेवारीनुसार, जसप्रीत बुमराहनं या मालिकेत आतापर्यंत 25 विकेट घेतल्या आहेत. तर दुसरीकडे मोहम्मद सिराज, आकाशदीप, हर्षित राणा, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, रवी अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर या सर्व गोलंदाजांनी मिळून केवळ 32 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 474 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथनं सर्वाधिक 140 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात, भारतानं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 5 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे भारतीय संघ पहिल्या डावात ऑस्ट्रेलियापेक्षा 310 धावांनी मागे आहे. सध्या भारतासाठी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा क्रीझवर आहेत. आता या दोघांकडून भारतीय चाहत्यांना चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.
हेही वाचा –
ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या खेळाडूनं विराट कोहलीची माफी मागितली, काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट! मुख्य निवडकर्ते मेलबर्नमध्ये दाखल
मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघानं केल्या या 3 मोठ्या चुका