इंडियन प्रीमिअर लीगचा १५वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सोमवारी (०४ एप्रिल) पार पडला. या सामन्यात लखनऊ संघाने शानदार कामगिरी करत ३ विकेट्सने सामना खिशात घातला. लखनऊच्या विजयाचा शिल्पकार आवेश खान ठरला. त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यात आवेशने सर्वाधिक विकेट्स घेत आपल्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, असा कारनामा त्याने पहिल्यांदाच केला आहे.
नाणेफेक जिंकत हैदराबाद संघाचा कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी लखनऊच्या फलंदाजांनी विलियम्सनचा निर्णय चुकीचा ठरवला. तसेच, शानदार फटकेबाजी केली आणि निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १६९ धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या हैदराबाद संघाला निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत फक्त १५७ धावाच करता आल्या.
आवेश खानची कामगिरी
हैदराबाद संघाच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्यांना पावरप्लेमध्येच २ मोठे धक्के बसले. हे धक्के दिले ते लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खानने (Avesh Khan). आवेशने पहिल्यांदा हैदराबादचा कर्णधार विलियम्सन १६ धावांवर खेळत असताना चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अँड्र्यू टायच्या हातात झेल देऊन तंबूत धाडले. त्यानंतर त्याने सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर अभिषेक शर्माला १३ धावांवर असताना मनीष पांडेच्या हातात झेल देऊन बाद केले. यानंतर आवेशने १८व्या षटकात गोलंदाजी करताना तिसऱ्या चेंडूवर विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनला ३४ धावांवर दीपक हुड्डाच्या हातून झेलबाद केले. पुढे हैदराबादचा विस्फोटक फलंदाज अब्दुल समदला तर पुढच्याच चेंडूवर म्हणजेच १८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शून्य धावेवर क्विंटन डी कॉकच्या हातून झेलबाद केले. या होत्या आवेश खानने घेतलेल्या ४ विकेट्स.
या ४ विकेट्ससह आवेशने स्वत:च्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली. तो आयपीएलमध्ये हैदराबादविरुद्ध खेळताना ४ विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. त्याच्यापूर्वी २०१४मध्ये लक्ष्मीपती बालाजी, २०१७मध्ये जयदेव उनाडकट, २०१८मध्ये मयंक मार्कंडेय, अंकित राजपूत आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी ही कामगिरी केली होती.
आवेश खानच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत २८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ८.२२च्या इकॉनॉमी रेटने ३६ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी ही आयपीएल २०२२मध्ये हैदराबादविरुद्ध केलेली २४ धावा देत ४ विकेट्स ही आहे.
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४ विकेट्स घेणारे गोलंदाज
लक्ष्मीपती बालाजी (२०१४)
जयदेव उनाडकट (२०१७)
मयंक मार्कंडे (२०१८)
अंकित राजपूत (२०१८)
प्रसिद्ध कृष्णा (२०१८)
आवेश खान (२०२२)*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022: केव्हा आणि कसा पाहाल बेंगलोर वि. राजस्थान सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
ताकदच बनली कमजोरी! लखनऊच्या फलंदाजांकडून SRHच्या ‘स्पीडस्टार’ उमरान मलिकची धू धू धुलाई