भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ चा अंतिम फेरीचा सामना येत्या रविवारी होणार आहे. अतिशय प्रतिष्टेच्या या सामन्यात भारत आणि पाकिस्तान स्पर्धेत दुसऱ्यांदा आमने- सामने येत आहेत.
यापूर्वी २००७च्या टी२० विश्वचषकात भारत पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात आमने-सामने आले होते. तसेच भारत- पाकिस्तान आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत २००६ साली अंडर १९ च्या विश्वचषकात आले होते. त्यात भारताला या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला होता. यावेळी पाकिस्तान संघाचा कर्णधार होता सर्फराज अहमद.
सध्याच्या संघात खेळणारे रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा त्यावेळी पराभूत झालेल्या भारतीय संघात होते. तसेच भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजाराही त्यावेळी संघात होता. तसेच विजयी पाकिस्तान संघातील इमाद वसिम हा त्यावेळी संघात होता.
२००८ साली भारताने अंडर १९ च्या विश्वचषक जिंकला. या संघाचं नेतृत्व केलं होत सध्या भारताचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीने. या संघात भारताचा सध्याचा आघाडीचा अष्टपैलू रवींद्र जडेजा होता. सलग दोन अंडर १९ विश्वचषक अंतिम सामने रवींद्र जडेजा २००६ आणि २००८ साली खेळला. भारताने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला होता.
उद्या होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यात २००६ आणि २००८ साली झालेल्या अंडर १९ विश्वचषकात भाग घेतलेले विराट कोहली, सर्फराज अहमद, रवींद्र जडेजा, इमाद वसिम, रोहित शर्मा हे खेळाडू खेळत आहेत.
विशेष म्हणजे विराट २००८च्या तर सर्फराज २००६च्या अंडर १९ विजयी विश्वचषक संघाचे कर्णधार होते.