भारतीय संघानं टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव विजेतेपद पटकावलं. यानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. मात्र आता या आनंदाच्या क्षणांमध्ये एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.
वास्तविक, खराब हवामान आणि सततच्या पावसामुळे भारतीय संघाचा परतीचा हवाई प्रवास प्रभावित झाला आहे. ‘बेरील’ नावाचं चक्रीवादळ कॅरिबियन बेटांच्या दक्षिण-पूर्व किनारपट्टीवर धडकत आहे. त्यामुळे भारतीय संघ सध्या बार्बाडोसमध्येच अडकला आहे. बार्बाडोस हे तेच ठिकाण आहे, जिथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना खेळला गेला होता.
बातम्यांनुसार, सध्या बार्बाडोसमध्ये जोरदार वारं वाहत आहे. सध्या पाऊस थांबला असला तरी वातावरण ढगाळ आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंसह मीडियाचे अनेक लोकही तिथे अडकले आहेत. बेरिल चक्रीवादळ संपल्यानंतर परिस्थिती सामान्य होताच हवाई प्रवास पुन्हा सुरू केला जाईल. बीसीसीआयचे सचिव जय शाह देखील सध्या बार्बाडोसमध्ये आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की ते टीम इंडियासह भारतात परततील.
बेरील वादळामुळे कॅरिबियन बेटांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून वादळ जसजसं जवळ येत आहे, तसतसा वाऱ्याचा वेग ताशी 130 मैलांपर्यंत पोहोचू शकतो. वाऱ्यांसोबतच समुद्रात भीषण लाटा येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या वादळामुळे बार्बाडोस, डोमिनिका आणि ग्रेनाडामध्ये सर्वाधिक विध्वंस होऊ शकतो. यासह इतर ठिकाणीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बार्बाडोसमध्ये संध्याकाळी 6 वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला असून पुढील सूचना जारी होईपर्यंत ही परिस्थिती कायम राहू शकते. यामुळे हवामान सुधारल्यानंतरच टीम इंडियाला मायदेशी परतणं शक्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“फायनलमधील विराट कोहलीच्या खेळीनं भारताला अडचणीत आणलं होतं”, संजय मांजरेकर पुन्हा बरळले
भारतीय महिला संघानं उडवला दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा! एकमेव कसोटीत 10 गडी राखून दणदणीत विजय
काय सांगता! भाजपाची महिला आमदार ऑलिम्पिकमध्ये खेळणार! पदक जिंकण्याची पण आहे संधी