आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी पाकिस्तानात आयोजित केली जाणार आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं संपूर्ण तयारी केली आहे. मात्र बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलंय.
भारत पाकिस्तान दौऱ्यावर जात नसल्याची बाब लक्षात घेऊन ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्येच खेळली जाऊ शकते. जय शाह आयसीसीचे अध्यक्ष बनल्यानंतर स्पर्धेचं हायब्रीड मॉडेल स्वीकारण्याबाबत चर्चा होत आहेत. मात्र या दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी एक धक्कादायक विधान केलं. भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, भारतीय संघानं 2008 पासून पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळलेला नाही. तर पाकिस्ताननं 2016 टी20 विश्वचषक आणि 2023 एकदिवसीय विश्वचषकासाठी भारताला भेट दिली होती. यापूर्वी पाकिस्ताननं 2023 आशिया चषकाचं आयोजन केलं होतं. परंतु भारतानं येण्यास नकार दिल्यामुळे ही स्पर्धा देखील हायब्रिड मॉडेलमध्ये खेळली गेली होती. आशिया कपचे भारताचे सामने श्रीलंकेत झाले होते. अशा परिस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफी देखील हायब्रीड मॉडेलच्या आधारे आयोजित केली जाऊ शकते.
या संदर्भात पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी लाहोरमधील स्थानिक वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, “मला विश्वास आहे की भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येईल. ते दौरा पुढे ढकलतील किंवा रद्द करतील, असं मला वाटत नाही”.
शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा पाकिस्ताननं जिंकली होती. संघानं अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता.
हेही वाचा –
श्रीलंकेचा हेड कोच बनला हा दिग्गज खेळाडू, भारताविरुद्ध ठोकल्या आहेत भरपूर धावा!
हार्दिक पांड्याचा ‘नो लुक’ शॉट पाहिला का? न बघताच हाणला जबरदस्त चौकार! VIDEO व्हायरल
उपांत्य फेरीच्या शर्यतीत अडकला भारत, पाकिस्ताननं बिघडवलं समीकरण; गणित जाणून घ्या