क्रिकेटविश्वात एक काळ असा होता की, षटकार मारणे ही खूप मोठी गोष्ट मानली जायची. षटकार मारला की फलंदाजासोबतच चाहतेही खूप खुश व्हायचे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सर डोनाल्ड ब्रॅडमन यांना क्रिकेटमधील महान फलंदाज म्हणून ओळखले जाते. पण त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत 6996 हून अधिक धावा करूनही त्याला फक्त 6 षटकार मारता आले. जस जसा काळ बदलत गेला तसतसा खेळ आणि खेळाडूंची खेळण्याची पद्धतही बदलत गेली. कालांतराने खेळाडू अधिक आक्रमक होत गेले आणि मर्यादित षटकांच्या खेळाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. आता प्रत्येक सामन्यात दोन्ही संघांकडून खेळाडू सातत्याने षटकार मारताना दिसतात. मात्र, षटकार मारण्याचीही एक कला आहे. हे केवळ 6 धावा मिळवण्याचा मार्ग नाही. षटकार मारण्यावरुन फलंदाजाची क्षमता आणि कौशल्य दिसून येते. क्रिकेटमध्ये काही खेळाडूंनी असे षटकार मारले आहेत जे वर्षानुवर्षे लक्षात राहतील. भारतीय चाहत्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर अनेक खेळाडूंनी शानदार षटकार ठोकले आहेत, जे चाहते कधीही विसरू शकत नाहीत. चला अशाच 7 खेळाडूंच्या षटकारांबद्दल जाणून घेऊया जे भारतीय चाहते कधीही विसरू शकत नाहीत.
एमएस धोनीचा वानखेडे स्टेडियमवर विजयी षटकार
2011 विश्वचषक फायनल आणि ठिकाण वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) मुंबई येथे कर्णधार एमएस धोनीच्या त्या षटकाराने संपूर्ण भारताला आनंद साजरा करण्याची संधी दिली. या क्षणाची सर्व देशवासीय 28 वर्षांपासून वाट पाहत होते. श्रीलंकेच्या 275 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धोनीने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. नुवान कुलसेकराच्या चेंडूवर षटकार ठोकून 28 वर्षांनी भारताला विश्वचषक मिळवून दिला. तो क्षण शब्दात वर्णन करता येणार नाही. धोनीचा तो षटकार वर्षानुवर्षे लक्षात राहील. जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासाची चर्चा होते तेव्हा धोनीच्या त्या षटकाराचा उल्लेख नक्कीच होईल.
सचिन तेंडुलकरचे 2003 मध्ये सेंच्युरियनमध्ये मारलेला षटकार
वनडे विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानकडून कधीही पराभूत झालेला नाही. मात्र, जेव्हा जेव्हा या दोन संघांमध्ये सामना होतो तेव्हा चाहते रोमांचित होत असतात. 2003 च्या विश्वचषकातही भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना झाला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सईद अन्वरच्या शानदार शतकाच्या जोरावर 50 षटकांत 273 धावा केलेल्या. भारताची फलंदाजी मजबूत असली तरी पाकिस्तानची गोलंदाजीही तितकीच चांगली होती. विशेषत: पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरबद्दल त्याच्या चेंडूंवर भारतीय फलंदाज धावा कशा करतील याची भारतीय चाहत्यांना अधिक चिंता होती. सेंच्युरियनच्या वेगवान खेळपट्टीवर शोएब अख्तर धोकादायक ठरेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र, त्याच अख्तरविरुद्ध सचिनने थर्ड मॅन च्या दिशेने मारलेला षटकार ‘अपर कट नावाने प्रसिद्ध झाला. सचिनने त्या सामन्यात 98 धावांची खेळी केली होती. भारताने हा सामना 26 चेंडू शिल्लक असताना जिंकला. अशा प्रकारे विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्धचा आणखी एक सामना जिंकला.
राहुल द्रविडचे 2011 मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे मारलेले षटकार
आपल्या पहिल्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात राहुल द्रविडने (Rahul Dravid) इंग्लंडविरुद्ध सलग 3 षटकार ठोकलेले. राहुल द्रविड हा फारसा आक्रमक फलंदाज मानला जात नव्हता. तो बहुतांश चेंडूंवर बचावात्मक वृत्तीचा अवलंब करत असे. कसोटी व वनडे क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केलेल्या द्रविडने त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत फक्त एकच टी20 सामना खेळला.
द्रविडने या सामन्यातील 11 व्या षटकात समित पटेलला सलग तीन षटकार ठोकले. त्याने पहिला षटकार मिड-विकेटवर मारला, दुसरा षटकार त्याने सरळ सीमारेषेबाहेर मारला, तर तिसरा षटकार त्याने स्विप केला. द्रविडचे ते 3 सर्वोत्तम षटकार अजूनही भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात ताजे आहेत.
सचिन तेंडुलकर 1998 मध्ये शारजाहमध्ये
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कोका-कोला कपच्या अंतिम सामन्यात सचिनने शेन वॉर्नच्या (Shane Warne) षटकात शानदार षटकार ठोकला. सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते. प्रत्येक सामन्यात या दोन खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा होती. 1998 मध्ये खेळलेला कोका-कोला कपही कायम स्मरणात राहील. त्या मालिकेतही दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा होती.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याच्या 20 व्या षटकात त्याने शेन वॉर्नच्या चेंडूवर पहिला षटकार मारला. शेन वॉर्नने सचिनला राऊंड द विकेट टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र, सचिनने चेंडू लाँग ऑन बाऊंड्रीबाहेर 6 धावांसाठी पाठवला. त्या सामन्यात वॉर्न खूप महागडा ठरला आणि त्याने एकही बळी न घेता 61 धावा केल्या. सचिन तेंडुलकरच्या एका खेळीने संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडले.
2004 मध्ये मुलतानमध्ये वीरेंद्र सेहवाग
भारताचा कसोटी क्रिकेटमधील पहिला त्रिशतकवीर म्हणून वीरेंद्र सेहवाग याचे नाव घेतले जाते. त्याने 2004 मध्ये मुलतान कसोटीत हे त्रिशतक ठोकलेले. या सामन्यात सेहवागने 295 धावांपर्यंत मजल मारली तेव्हा तो त्रिशतक पूर्ण करण्यासाठी बचावात्मक दृष्टीकोन अवलंबेल असे सर्वांना वाटत होते. मात्र, सेहवागच्या मनात काही वेगळेच सुरू होते. त्याच्यावर 300 धावा करण्याचे कोणतेही दडपण नव्हते. तो 295 धावसंख्येवर असताना पाकिस्तानी संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताक गोलंदाजीला आला. पाकिस्तानने सेहवागवर दबाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, सेहवागने षटकार ठोकला. या षटकारासह सेहवागने इतिहास रचला होता. कसोटी क्रिकेटमध्ये 300 धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.
युवराज सिंग 2007 मध्ये डर्बनमध्ये सहा षटकार
युवराज सिंगने पहिल्या टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते. 2007 च्या पहिल्या टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर युवराज सिंगने मारलेले 6 षटकार कोणी विसरू शकणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे दुसऱ्यांदा घडत असले तरी, भारताकडून विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर अशी कामगिरी पहिल्यांदाच घडली होती. त्यामुळे हा क्षण भारतीय क्रिकेट तसेच जागतिक क्रिकेटच्या नेहमी लक्षात राहणारा आहे.
दिनेश कार्तिकचा निदाहास ट्रॉफीच्या फायनलमधील षटकार
2018 च्या निदाहस ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) मारलेला षटकार नेहमीच लक्षात राहील. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 166 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सामना अत्यंत रोमांचकारी स्थितीत पोहोचला. भारतीय संघाला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची गरज होती आणि दिनेश कार्तिकने शानदार षटकार ठोकत सामना जिंकला. हा सामना क्रिकेटप्रेमींच्या नेहमीच लक्षात राहील. (indian cricketer sixes cricket fans remember always)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता डोळ्यांना ताण देण्याची गरज नाही! बीसीसीआयने जिओला दिली मंजुरी, 4K व्हिडिओत दिसणार आयपीएल सामने
‘या यशाचे श्रेय वडिलांचे’, अहमदाबादमधील शतकानंतर शुबमनची कृतज्ञ कबुली