भारतात अनेक जण क्रिकेट खेळतात. त्या प्रत्येकाचे विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न असते. पण त्यातील काही जणांनाच आपल्या देशाकडून विश्वचषकामध्ये खेळण्याचे भाग्य लाभते. पण काहीजण तर इतके दुर्दैवी ठरतात की त्यांची विश्वचषकासाठी संघात निवड होऊनही त्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळत नाही.
असे विश्वचषकात निवड होऊन एकही सामना खेळायला न मिळालेले खेळाडू –
१. पार्थिव पटेल – २००३ विश्वचषक
२००३ च्या विश्वचषकावेळी संघात ज्यादाचा गोलंदाज किंवा फलंदाज खेळवण्यासाठी राहुल द्रविडनेच यष्टीरक्षणाचीही जबाबदारी स्विकारल्याने यष्टीरक्षक फलंदाज असणाऱ्या पार्थिवला एकही सामना त्या विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नाही.
२. अमया खुर्शिया – १९९९ विश्वचषक
१९९९ ला सातवा विश्वचषक पार पडला. या विश्वचषकासाठी अमया खुर्शिया यांची भारतीय संघात निवड झाली होती. मात्र त्यांना एकही सामना खेळण्याती संधी मिळाली नाही. ते भारताकडून १९९९ ते २००१ या कालावधीत १२ वनडे सामने खेळले. यात त्यांना केवळ १४९ धावाच करता आल्या. यात त्यांच्या नावावर केवळ १ अर्धशतक आहे.
३. अंबाती रायडू – २०१५ विश्वचषक
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडू २०१५ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग होता. मात्र त्यावेळी संघात शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, एमएस धोनी, अजिंक्य रहाणे असे फलंदाजही संघात असल्याने अंबाती रायडूला या विश्वचषकात एकही सामना खेळता आला नाही.
४. संजय बांगर – २००३ विश्वचषक
२००३ च्या विश्वचषकात संजय बांगर यांना भारताच्या संघात संधी मिळाली होती. मात्र त्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी कारकिर्दीत २००२ ते २००४ च्या कालावधीत १५ सामने खेळले. यात त्यांनी १८० धावा केल्या. त्याचबरोबर ७ वनडे विकेट्स घेतल्या आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले. नुकतेच २०१९ च्या विश्वचषकानंतर त्यांचा प्रशिक्षणपदाचा करार संपुष्टात आला.
५. इरफान पठाण – २००७ विश्वचषक
२००३ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या इरफानची त्याच्या शानदार कामगिरीमुळे २००७ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली होती. परंतू त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. या विश्वचषकात भारताचे साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आल्याने भारताला अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. इरफानने त्याच्या कारकिर्दीत १२० वनडे सामने खेळताना १५४४ धावा केल्या आहेत आणि १७३ विकेट्स घेतल्या आहेत.
६. स्टुअर्ट बिन्नी – २०१५ विश्वचषक
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीची २०१५ च्या भारतीय संघात निवड झाली होती. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने १४ वनडे सामने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत खेळले आहेत. यात त्याने २३० धावा आणि २० विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच त्याने २०१४ मध्ये ढाका येथे बांगलादेशविरुद्ध खेळताना ४.४ षटकात ४ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. भारतीय गोलंदाजाने वनडेत केलेले हे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन आहे.
७. अक्षर पटेल – २०१५ विश्वचषक
अष्टपैलू क्रिकेटपटू असलेल्या अक्षर पटेलची २०१५ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली होती. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्या विश्वचषकात रविंद्र जडेजाही भारतीय संघाचा भाग असल्याने आणि तो डावकरी फिरकीपटू असल्याने त्याला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे अक्षर पटेलला संधी मिळाली नाही. अक्षर पटेलने त्याच्या कारकिर्दीत ३८ वनडे सामने खेळले. त्यात त्याने ४५ विकेट्स घेतल्या आहेत.
८. सुनील वॉल्सन – १९८३ विश्वचषक
१९८३ विश्वचषकात भारतीय संघातील केवळ सुनील वॉल्सन यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. हा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता. या विश्वचषकानंतर कधीही सुनील वॉल्सन यांना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पण झाले नाही.
९. भारत रेड्डी – १९७९ विश्वचषक
१९७९ च्या विश्वचषकासाठी भारत रेड्डी यांचा राखीव यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड झाली होती. पण त्यांना त्या विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी १९७८ ते १९८१ या कालावधीत त्यांच्या वनडे कारकिर्दीत ३ सामने खेळले. यात त्यांना केवळ ११ धावा करता आल्या. तसेच त्यांनी २ झेल घेतले.
१०. दिनेश कार्तिक – २००७ विश्वचषक
२००७ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात एमएस धोनीचाही समावेश असल्याने त्याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे दिनेश कार्तिकला त्या विश्वचषकात निवड होऊनही एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पण या विश्वचषकानंतर २०१९ ला झालेल्या विश्वचषकात मात्र दिनेश कार्तिकची भारतीय संघात निवडही झाली आणि त्याला सामने खेळण्याची संधीही मिळाली.
ट्रेडिंग घडामोडी –
मदत करुनही धोनीला चाहते करत आहे सोशल मिडीयावर ट्रोल
५ भारतीय दिग्गज खेळाडू जे कधीही विश्वचषकात खेळले नाहीत
४ खेळाडू ज्यांनी मैदानं गाजवले होते, आता थेट रस्त्यावर उतरुन करताय लोकांची मदत