जगातील कोणत्याही व्यक्तीसाठी शिक्षण हे महत्त्वाचे असते. तो व्यक्ती जगात कुठेही गेला तरी त्याने घेतलेले ज्ञान त्याच्याबरोबर राहते. पण खेळ हे क्षेत्र असे आहे जिथे अनेकांनी शिक्षणापेक्षाही आपल्या कर्तृत्वाने हे क्षेत्र गाजवले आहे. मात्र काही असेही खेळाडू आहेत, ज्यांनी उच्चशिक्षण घेत खेळातही आपले नाव गाजवले.
असेच भारताचे २ असे क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी क्रिकेटबरोबरच शिक्षणाची वाट सोडली नाही. त्यातील एक क्रिकेटपटू तर आएएस आहे, तर एकाने पीएचडी केली आहे. हे क्रिकेटपटू म्हणजे अविष्कार साळवी आणि अमेय खुरासिया.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज अविष्कार साळवीने ऍस्ट्रोफिजिक्समध्ये पीएचडी केली आहे. त्याची ग्लेन मॅकग्रा सारखी गोलंदाजी शैली असल्याने चर्चेत आला होता. त्याने २००३ ला भारतीय संघाकडून बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यातून पदार्पण केले होते. पण तो केवळ ४ वनडे सामने खेळू शकला. पण असे असले तरी तो २०१३ पर्यंत देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे.
मुंबईकडून खेळणाऱ्या अविष्कारने ६२ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि ५२ अ दर्जाचे सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणीमध्ये १६९ विकेट्स तर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ७१ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच २००९ आणि २०११ तो दिल्ली डेअरडेविल्सकडून आयपीएलमध्येही खेळला. त्यावेळी त्याला त्याचा आदर्श असलेल्या मॅकग्राबरोबर गोलंदाजी करण्याचीही संधी मिळाली होती.
तसेच अमेय खुरासिया भारतीय संघात येण्याआधीच आएएसची परिक्षा उत्तीर्ण झाला होता. त्याने १९९९ ला भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. पण त्याची कारकिर्द खूप बहरली नाही. त्याने केवळ १२ वनडे सामने खेळले. यात त्याने १ अर्धशतकासह १४९ धावा केल्या. त्याची १९९९ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली होती. पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
पण असे असले तरी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने ११९ प्रथम श्रेणी सामने खेळले. तसेच ११२ अ दर्जाचे सामने खेळले. त्याने प्रथम श्रेणीमध्ये ४०.८० च्या सरासरीने २१ शतके आणि ३१ अर्धशतकांसह ७३०४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ४ शतके आणि २६ अर्धशतकांसह ३८.०६ च्या सरासरीने ३७६८ धावा केल्या आहेत.
या दोघांव्यतिरिक्त भारतीय संघाचे हे खेळाडू देखील आहेत उच्चशिक्षित –
आर अश्विन – भारताचा फिरकीपटू आर अश्विनने तंत्रज्ञान विषयात इंजिनीरिंग केले आहे. त्याने त्याचे शालेय शिक्षण पद्म सेशाद्री बाल भवन आणि सेंट बेडे अँग्लो इंडियन उच्च माध्यमिक शाळेतून घेतले आहे. त्यानंतर त्याने चेन्नईतील एसएसएन कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमधून इंजिनीयरिंग पूर्ण केले आहे.
जवागल श्रीनाथ – भारताचे माजी दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथ यांनीही इंस्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनियरिंग पूर्ण केले आहे. त्यांनी त्यांचे इंजिनियरिंगचे शिक्षण जेएसएस सायन्स अँड टेन्कोलॉजी युनिवर्सिटी, म्हैसूर येथून घेतले आहे.
राहुल द्रविड – भारताचा द वॉल म्हणून ओळखला जाणाऱ्या राहुल द्रवि़डने सेंट जोसेफ बॉईज हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्याने वाणिज्य शाखेची पदवी सेंट जोसेफ वाणिज्य महाविद्यालयातून पूर्ण केले.
तसेच त्याचा जेव्हा भारतीय संघात समावेश करण्यात आला तेव्हा तो सेंट जोसेफ कॉलेज ऑफ बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशनमधून एमबीएचे शिक्षण घेत होता.
अनिल कुंबळे – भारताचा माजी दिग्गज गोलंदाज आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेने मॅकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्याने बंगळूरुमधील राष्ट्रीय विद्यालय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून त्याचे इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.
के श्रीकांत – भारताचे माजी कर्णधार क्रिष्णमाचारी श्रीकांत यांनीही इंजिनियरिंगचेच शिक्षण घेतले आहे. त्यांनी चेन्नईतील अभियांत्रिकी महाविद्यालय, गिन्डी येथून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे.
ट्रेंडिंग लेख –
कसोटी सामन्यात ४०० धावा करणारे जगातील ४ फलंदाज, एक खेळाडू आहे…
बेटा बेटा होता हैं, बाप बाप होता हैं! असं बोलल्याचा सेहवागचा हा दावा आहे खोटा, कारण…
आईच सर्वकाही! आईमुळे घडलेले ५ महान क्रिकेटपटू