ज्यावेळी खेळाडू आपल्या करिअरची सुरुवात करतो त्यावेळी त्याचे स्वप्न असते की, आपल्याला आपल्या देशासाठी खेळायचय. आपल्या देशाचं नाव मोठं करायचंय. आयुष्यातील अनेक वर्ष हे खेळाडू फक्त त्या खेळासाठी देत असतात. प्रचंड मेहनत घेऊन ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतातही. पण, त्यांना स्वतःला सिद्ध करायची पुरेशी संधीच मिळत नाही. क्रिकेटच्या मैदानावरही या गोष्टी घडत असतात. ज्या भारतात क्रिकेटला धर्म म्हणून पाहिलं जातं, तिथे रोज हजारो क्रिकेटर्स तयार होत असतात. त्यातील अगदी थोडेच देशासाठी खेळतात, पण त्यातही असे काही कमनशिबी आहेत, ज्यांना टीम इंडियाची कॅप आयुष्यात फक्त एकदाच डोक्यावर चढविण्याची संधी मिळाली. आज आपण त्याच दुर्दैवी भारतीय क्रिकेटर्सविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांना फक्त एक इंटरनॅशनल मॅच खेळायला भेटली.
या कमनशिबी भारतीय क्रिकेटर्हच्या यादीची सुरुवात करता येईल अजूनही डोमेस्टिक क्रिकेट खेळत असलेल्या फैज फजलपासून. सध्या ३७ वर्षांचा असलेला, विदर्भला दोन वेळा रणजी चॅम्पियन बनवणारा आणि १३ हजारपेक्षा जास्त रन्स नावावर असलेला डावखुरा ओपनर फैज, भारतासाठी फक्त एक वनडे खेळला. जवळपास १३ वर्ष डोमेस्टिक क्रिकेट खेळल्यानंतर २०१६ ला त्याला पहिल्यांदा भारतीय संघात संधी देण्यात आली. झिम्बाब्वेविरूद्ध त्याने इंटरनॅशनल डेब्यू केला. त्या मॅचमध्ये त्याने नॉट आउट फिफ्टीही मारली. त्यानंतर मात्र त्याचा आजतागायत कधीही टीम इंडियासाठी विचार झाला नाही.
अगदी सचिन तेंडुलकरसारखा क्रिकेटर ज्याचा फॅन होता तो अभिजीत काळेदेखील टीम इंडियाची जर्सी फक्त एकदाच अंगावर चढवू शकला. सचिन-कांबळीने ज्या वेळी क्रिकेटला सुरुवात केली त्याचवेळी मुंबई क्रिकेटमध्ये अभिजीत काळे हे नावदेखील गाजत होते. मुंबईमध्ये पुरेशी संधी न मिळाल्याने अभिजीतने महाराष्ट्रासाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळले. जवळपास दहा वर्षे डोमेस्टिक क्रिकेट गाजवल्यानंतर २००३ मध्ये अभिजीतला इंटरनॅशनल डेब्यू करण्याची संधी मिळाली. त्याने बांगलादेशविरुद्ध आपला एकमेव वनडे खेळला. मात्र त्यानंतर त्याच्या करिअरने अचानक वेगळे वळण घेतले. तत्कालीन सिलेक्टर किरण मोरे आणि प्रणव रॉय यांनी अभिजीतने आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप लावले. अभिजीतने कबूल केले की, आपण फक्त त्यांच्या नजरेत येण्याचा प्रयत्न केला, मात्र लाच दिली नाही. या प्रकरणानंतर त्याला बॅन करण्यात आले आणि तो पुन्हा भारतासाठी खेळताना दिसला नाही.
अभिजीत काळेप्रमाणेच महाराष्ट्राचाच आणखी एक क्रिकेटर इक्बाल सिद्दिकी हा देखील भारतासाठी फक्त एक मॅच खेळू शकला. सहा फुटांपेक्षा जास्त उंची असलेला इक्बाल फास्ट बॉलर तसेच उपयुक्त बॅटर होता. जवळपास दहा वर्ष डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर, २००१ मध्ये इंग्लंड विरुद्ध त्याला टेस्ट डेब्यूचा चान्स दिला गेला. विशेष म्हणजे मनोज प्रभाकर यांच्यानंतर भारतासाठी ओपनिंग बॉलिंग आणि ओपनिंग बॅटिंग करणारा तो दुसरा क्रिकेटर होता. त्या मॅचमध्ये भारताला जिंकण्यासाठी दुसऱ्या डावात फक्त पाच रन्स हवे होते. त्यावेळी त्याला बॅटिंगची संधी देण्यात आली होती. यानंतर मात्र तो कधीही इंटरनॅशनल क्रिकेट खेळताना दिसला नाही. पुढे, २००५ मध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळून नावारूपाला आलेला कर्नाटकचा लेफ्ट आर्म पेसर श्रीनाथ अरविंद हादेखील भारतासाठी फक्त एकच मॅच खेळू शकला. २०१३-२०१४ या वर्षांमध्ये कर्नाटकने जिंकलेल्या इराणी ट्रॉफी, रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी या विजेतेपदांमध्ये श्रीनाथचा सिंहाचा वाटा होता. तसेच तो आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत. याचे बक्षीस म्हणून त्याला २०१५ मध्ये भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या टी२० मॅचमध्ये ३.४ ओव्हर्समध्ये ४४ रन्स लुटवल्यानंतर तो पुन्हा कधीच भारतासाठी खेळताना दिसला नाही. त्याने २०१८ मध्ये रिटायरमेंट घेतली.
आयपीएल २०१८ च्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा युवा लेगस्पिनर मयंक मार्कंडे चांगलाच चर्चेत आला. एमएस धोनीसह तीन विकेट घेत त्याने खळबळ उडवून दिली. त्यानंतर पूर्ण सीझनमध्ये तो चमकदार कामगिरी करताना दिसला. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पंजाबसाठी खेळणारा मयंक त्या आयपीएलमध्ये मुंबईसाठी, आणि त्यानंतरच्या रणजी सीजनमध्ये पंजाबसाठी हायेस्ट विकेट टेकर होता. या कामगिरीचे बक्षीस म्हणून २०१९ मध्ये त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मधून इंटरनॅशनल डेब्यू करण्याची संधी मिळाली. मात्र, तो संधीचे सोने करू शकला नाही. त्यानंतर युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चहर आणि वरूण चक्रवर्ती यांच्यासारख्या लेगस्पिनर्सनी दमदार परफॉर्मन्स दिला आणि मयंक अपयशी ठरत गेला. त्यामुळे तो पुन्हा कधीही टीम इंडियाच्या ब्लू जर्सीत दिसला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
एकहजारी मनसबदार बनला कर्णधार रोहित, विराटचा विक्रम मोडला; पण आझमपासून मागे राहिला
स्टार टेनिसपटू राफेल नदालची विम्बल्डनमधून माघार, जाणून घ्या का घेतला मोठा निर्णय
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ४: …अगदी ठरवुन ‘त्यांनी’ गांगुलीला रडवले