भारतात क्रिकेट हा खेळ खूप लोकप्रिय झाला असून यामुळे खेळाडूंना मिळणाऱ्या पैशात सातत्यानं वाढ होत आहे. इंडियन प्रीमियर लीगचं आगमन झाल्यापासून क्रिकेटपटूंच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली. क्रिकेटपटूंची कमाई जसजशी वाढत आहे, तसतसे ते त्यांचे पैसे विविध पद्धतीनं गुंतवत आहेत. मात्र, काही क्रिकेटपटू त्यांच्या व्यवसायामुळे वादातही सापडले. अशाच पाच भारतीय क्रिकेटपटूंबाबत आपण या बातमीद्वारे जाणून घेऊया.
(5) आकाश चोप्रा – आकाश चोप्रा यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 57 लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली होता. त्यांनी त्यांच्या तक्रारीत हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या माजी सदस्याच्या मुलाचं आणि सिकंदराबादमधील स्पोर्ट्स शूजच्या दुकानाच्या मालकाचं नाव घेतलं होतं. तक्रारीत म्हटलं आहे की, त्या व्यक्तीने चोप्राचे पैसे 20 टक्के नफ्यासह परत करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, वर्षभरानंतरही चोप्रांना केवळ 24.5 लाख रुपयेच मिळाले.
(4) रॉबिन उथप्पा – भारताचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा विरोधात पीएफ घोटाळ्याप्रकरणी अलीकडेच अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. उथप्पा याच्यावर कपड्यांच्या व्यवसायात काम करणाऱ्या लोकांच्या पगारातून पैसे कापून ते त्यांच्या पीएफ खात्यात जमा न केल्याचा आरोप आहे. ही रक्कम अंदाजे 24 लाख रुपये असल्याचं बोललं जातंय.
उथप्पाला अटक करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत, मात्र आता तो दुबईत राहत असल्यानं या अटक वॉरंटला काही अर्थ नाही. आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण देताना उथप्पा म्हणाला की, जेव्हा त्यानं निधी दिला तेव्हा त्याला कंपनीचं संचालक बनवलं होतं, परंतु जेव्हा कंपनी कर्जाची परतफेड करू शकली नाही तेव्हा त्यानं ती सोडली.
(3) हार्दिक आणि कृणाल पांड्या – एप्रिल 2024 मध्ये हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या यांनी त्यांचा चुलत भाऊ वैभव विरुद्ध एफआयआर दाखल केला होता. रिपोर्ट्सनुसार, 2021 मध्ये त्यांनी वैभवसोबत एक बिझनेस सुरू केला ज्यामध्ये वैभवचा हिस्सा 20 टक्के होता. पांड्या ब्रदर्सनं 40-40 टक्के गुंतवणूक केली होती आणि नफ्याचा वाटा गुंतवणुकीएवढाच असणार होता. मात्र, वैभवनं नफ्यात समान वाटा देण्याऐवजी सुमारे 34 टक्के हिस्सा स्वत:कडे घेतला होता. यामुळे पांड्या ब्रदर्सचं 4.3 कोटी रुपयांचं नुकसान झालं. वैभवला अटक करण्यात आली असून तो पाच दिवस पोलिस कोठडीत होता.
(2) विराट कोहली – अलीकडेच, विराट कोहलीच्या बंगळुरूमधील वन8 कम्युन पबबाबत वाद निर्माण झाला होता. हा पब परवानगीशिवाय आणि एनओसीशिवाय चालवल्याचा आरोप होता. एका सामाजिक कार्यकर्त्यानं पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पबला सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, आठवडाभरात यावर योग्य ती सफाई न आल्यास पबवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
(1) महेंद्रसिंह धोनी – 2019 मध्ये रिअल इस्टेट कंपनी आम्रपाली ग्रुपच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. या ग्रुपवर ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप होता. या कंपनीनं भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला आपल्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी ब्रँड ॲम्बेसेडर बनवलं होतं. वृत्तानुसार, धोनीला जाहिरातीसाठी 42 कोटी रुपये मिळाले होते आणि या संस्थेच्या एका प्रोजेक्टमध्ये धोनीनं पेंटहाऊस विकत घेतल्याचंही सांगण्यात आलं होतं.
मात्र, गुंतवणूकदारांकडून हजारो कोटी रुपये घेतल्यानंतरही प्रकल्प पूर्ण झाले नाहीत आणि आम्रपाली समूहानं लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तक्रार दाखल करणाऱ्या लोकांनी धोनीचाही आरोपींमध्ये समावेश करावा, अशी मागणी केली होती. या प्रकरणामुळे धोनी चांगलाच अडचणीत आला होता.
हेही वाचा –
बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू लग्न बंधनात अडकली, सुंदर फोटो पाहा
IND vs AUS: मेलबर्न कसोटीत भारताची गोलंदाजी बदलणार! हा खेळाडू होणार बाहेर
IPL 2025; ध्रुव जुरेलसाठी संजू सॅमसन विकेटकीपिंगचा करणार त्याग! घेतला मोठा निर्णय