आत्तापर्यंत भारतकडून अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पण प्रत्येकाचीच कारकिर्द बहरली नाही. अनेकदा २ खेळाडूंचे एकाच सामन्यातून पदार्पण झाले. त्यातील एकाने पुढे जाऊन मोठी कारकिर्दही घडवली. पण दुसऱ्याची मात्र तितकी कारकिर्द बहरली नाही. अशा एकाच सामन्यातून भारताकडून पदार्पण केलेल्या जोड्यांचा घेतलेला हा आढावा –
१. एमएस धोनी आणि जोगिंदर शर्मा – २३ डिसेंबर २००४ ला चितगाव येथे बांगलादेशविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातून एमएस धोनी आणि जोगिंदर शर्माने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
त्या सामन्यानंतर धोनीने मोठी कारकिर्द घडवली. तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारही झाला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजारांपेक्षाही अधिक धावा केल्या. तसेच यष्टीमागे ६०० पेक्षा अधिक विकेट्सही घेतल्या.
जोगिंदर शर्माची कारकिर्द मात्र तितकी बहरली नाही. त्याच्या कारकिर्दीत सर्वोत्तम क्षण ठरला तो २००७ च्या टी२० विश्वचषकातील अंतिम सामन्यात घेतलेली मिस्बाह उल हकची विकेट. त्या विकेटमुळे भारताला तो विश्वचषक जिंकणे सोपे झाले. मात्र त्यानंतर तो एकही सामना खेळला नाही. तो सध्या हरियाणा पोलिसमध्ये उपायुक्त आहे.
२. आर अश्विन आणि पंकज सिंग – ५ जून २०१०ला हरारेमध्ये श्रीलंका विरुद्ध वनडे सामन्यातून आर अश्विन आणि पंकज सिंग यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या दोघांनीही पदार्पण करण्याआधी इंडियन प्रीमीयर लीगमध्ये शानदार कामगिरी करत प्रभावित केले होते.
आर अश्विनने या सामन्यानंतर २०११ च्या विश्वचषकासाठीही भारतीय संघात स्थान मिळवले. एवढेच नाही तर तो भारताच्या यशस्वी गोलंदाजांमध्ये सध्या गणला जातो. त्याने ३५० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय विकेट्सही घेतल्या आहे.
पण पंकजची कारकिर्द मात्र एवढी बहरली नाही. तो हा एकमेव वनडे सामना भारताकडून खेळला. तसेच नंतर २०१४ मध्ये तो इंग्लंडविरुद्ध २ कसोटी सामने खेळला. याव्यतिरिक्त त्याला मोठी कारकिर्द घडवता आली नाही. या तीन आंतरराष्ट्रीय सामन्यात मिळून त्याने २ विकेट्स घेतल्या आणि १३ धावा केल्या.
३. गौतम गंभीर आणि अविष्कार साळवी – ११ एप्रिल २००३ ला टीव्हीएस कपमध्ये ढाका येथे बांगलादेश विरुद्ध गौतम गंभीर आणि अविष्कार साळवी यांनी पदार्पण केले. गंभीरची विरेंद्र सेहवागचा साथीदार म्हणून सलामीला फलंदाजी करण्यासाठी निवड झाली होती.
गंभीरने या सामन्यानंतर त्याची मोठी कारकिर्द घडवली. त्याने भारताला २००७ चा टी२० विश्वचषक आणि २०११ चा विश्वचषक जिंकून देण्यातही महत्त्वाचा वाटा उचलला. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजारांपेक्षाही अधिक धावा केल्या.
मात्र त्याचवेळी वेगवान गोलंदाज अविष्कार साळवीची कारकिर्द बहरली नाही. तो भारताकडून केवळ ४ वनडे सामने खेळू शकला. तसेच मुंबईकडूनही तो शेवटचा २०१२ मध्ये प्रथम श्रेणी सामना खेळला. तर २०१३मध्ये शेवटचा अ दर्जाचा आणि ट्वेंटी२० चा सामना त्याने खेळला.
४. सुरेश रैना आणि वेणूगोपाळ राव – ३० जूलै २००५ ला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यातून डंबुला येथे सुरेश रैना आणि वेणूगोपाळ राव या दोन फलंदाजांनी पदार्पण केले. त्याआधी त्या दोघांनीही देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली होती.
पहिल्या सामन्यात रैना शून्यावर बाद झाला. पण नंतर त्याने त्याची कामगिरी सुधारत चांगली कारकिर्द घडवली. तो २०११ च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचाही भाग होता. तसेच त्याने केवळ फलंदाजीतच नाही तर काहीवेळा गोलंदाजीतही त्याचे योगदान दिले. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच ५० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
दुसरीकडे वेणूगोपाळ रावने पहल्या सामन्यात ३८ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर मात्र तो केवळ १५ च वनडे सामने खेळू शकला. त्याच्या कामगिरीत सातत्य नसल्याने त्याला भारतीय संघात जास्त संधी मिळाली नाही.
५. सचिन तेंडुलकर आणि सलील अंकोला – १९८९ ला झालेल्या पाकिस्तान दौऱ्यात १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान कराची येथे झालेल्या कसोटी सामन्यातून सचिन तेंडूलकर आणि सलील अंकोलाने पदार्पण केले होते. त्यांनी २८ डिसेंबर १९८९ ला वनडे पदार्पणही एकाच सामन्यातून केले.
या सामन्यानंतर सचिन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर झाला. त्याने १०० आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आणि जगातील सर्वाधिक धावा करणाराही तो फलंदाज ठरला. त्याने ३४००० पेक्षाही अधिक धावा केल्या. तो जगातील सर्वोत्तम फलंदाजही ठरला.
मात्र त्याच्याचबरोबर पदार्पण केलेला सलील अंकोला मात्र केवळ २० वनडे आणि पदार्पणाचा केवळ १ कसोटी सामना खेळला. त्याचा १९९६ मध्ये झालेल्या विश्वचषकातही समावेश होता. पण त्यानंतर त्याने १९९७ मध्ये २८ वर्षांचा असतानाच अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.